सात जोडपी रंगेहाथ पकडली, कॅफे चालकावर गुन्हा दाखल
साईमत/जळगाव/प्रतिनिधी :
जामनेर तालुक्यातील बेटावद येथील कॅफेमधील घटनेची गंभीर दखल घेत जळगाव शहरातील रामानंदनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील ‘कॉलेज कट्टा’ नावाच्या कॅफेवर गुरुवारी, १४ ऑगस्ट रोजी दुपारी २ वाजता पोलिसांनी छापा टाकला. कॅफेत शाळेसह महाविद्यालयातील मुला-मुलींना अश्लील चाळे करण्यासाठी जागा उपलब्ध करून दिली जात होती. अशातच पोलिसांनी टाकलेल्या छाप्यात सात जोडपी अश्लील चाळे करत असताना रंगेहाथ पकडली. याप्रकरणी रामानंदनगर पोलीस ठाण्यात कॅफे चालकावर गुन्हा दाखल केल्याचे पोलिसांनी सांगितले. दरम्यान, अशा प्रकारच्या कॅफेमुळे समाजात गैरप्रकार वाढू शकतात. त्यामुळे अशा कारवाईचे सुज्ञ नागरिकांनी स्वागत केले आहे.
रामानंदनगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजेंद्र गुंजाळ यांना गोपनिय माहिती मिळाली होती की, ‘कॉलेज कट्टा’ कॅफेमधील गाळ्यांमध्ये प्लायवूडचे कंपार्टमेंट करून पडदे लावून आणि अंधार करून शाळेसह महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना अश्लील कृत्ये करण्यासाठी प्रोत्साहन मिळत आहे. अशा माहितीच्या आधारे, पोलीस निरीक्षक गुंजाळ यांच्या नेतृत्वाखाली पथकाने गुरुवारी दुपारी अचानक कॅफेवर छापा टाकला.
पालकांना बोलावून जोडप्यांना दिली समज
पोलिसांनी टाकलेल्या छाप्यात सात जोडपी अश्लील चाळे करत असताना रंगेहाथ पकडण्यात आली. पोलिसांनी त्यांना बाहेर बोलावून त्यांची माहिती घेतली. त्यानंतर त्यांच्या पालकांना बोलावून त्यांना समज देण्यात आली. धक्कादायक बाब म्हणजे, कॅफेमध्ये दर्शनी भागात कुठलाही परवाना लावलेला नव्हता. याप्रकरणी कॅफे चालक मुकेश वसंत चव्हाण (वय ३०, रा. रोटवद, ता. जामनेर, ह.मु. लाडवंजारी मंगल कार्यालय, जळगाव) याच्या विरोधात रामानंदनगर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
यांनी केली कारवाई
ही कारवाई पोलीस अधीक्षक डॉ.महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, विभागीय पोलीस अधिकारी संदीप गावित यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक राजेंद्र गुंजाळ यांच्या नेतृत्वात, पोलीस उपनिरीक्षक सचिन रणशेवरे, पोलीस हवालदार सुधाकर अंभोरे, जितेंद्र राजपूत, जितेंद्र राठोड, सुशील चौधरी, पोलीस नाईक योगेश बारी, मनोज सुरवाडे, रेवानंद साळुंखे, अतुल चौधरी, विनोद सूर्यवंशी आणि महिला पोलीस शिपाई स्वाती पाटील यांनी यशस्वीपणे पार पाडली.