साईमत/ न्यूज नेटवर्क/अमळनेर :
शहरातील राम मंदिर, प्रताप तत्त्वज्ञान केंद्रापासून ते बंगाली फाईल, अयोध्या नगर, रामवाडी, केशवनगर, गायत्री नगर, गणेश कॉलनी आणि तांबेपुरापर्यंत पूर्ण ‘रस्त्यात खड्डे का खड्ड्यात रस्ता’ आहे हेच कळत नाही. कारण या भागातील रस्ते चिखलाने पूर्णपणे माखले आहेत. त्यामुळे रस्त्याचे ‘तीन तेरा’ वाजले आहेत. या रस्त्यातून पायी चालणे आणि दुचाकीवरूनही जाणे अशक्य झाले आहे. त्यामुळे परिसरातील महिलांनी डंपर अडवून रास्ता रोको केला. ही समस्या तात्काळ न मिटविल्यास महिलांनी पालिकेवर मोर्चा काढण्याचा इशारा दिला आहे. त्यामुळे परिसरातील महिलांनी नगर पालिका प्रशासनाविरुद्ध एल्गार पुकारला होता.
अमळनेर शहरातील विविध भागात भुयारी गटारीचे काम अद्यापही सुरूच आहे. त्यासाठी खोदून ठेवलेल्या रस्त्यात पावसामुळे मोठ्या प्रमाणावर चिखल साचला आहे. त्यासाठी हे काम पावसाळ्यात बंद ठेवावे आणि खोदलेल्या रस्त्यासाठी पर्यायी व्यवस्था करून दुरुस्ती करावी, अशी मागणी परिसरातील लोकांकडून होत आहे. शहरातही मुख्य बाजारपेठ चौक, कॉलनीतही रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात पाणी साचले आहे. त्यामुळे त्याच्या निचऱ्याची व्यवस्था करणे गरजेचे झाले आहे. परिसरात राम मंदिरापासून रस्ता चिखलमय झालेला आहे. वारंवार नगरपालिका प्रशासनाला तक्रार करूनही ते लक्ष देण्यास तयार नाही. नुसता मातीचा मुरूम टाकून देतात. त्यामुळे जास्त चिखल होऊन आणि त्याचा त्रास नागरिकांना सहन करावा लागत आहे. शाळेतील विद्यार्थ्यांना रस्त्यावरुन चालणेही अशक्य झाले आहे. विप्रोचे मोठमोठे वाहन याच रस्त्याने जातात. त्यामुळे अधिकच खड्डे पडतात आणि चिखलही भरपूर प्रमाणात होतो. याकडे पालिकेने लक्ष न दिल्यास अखेर अयोध्या नगर, रामवाडी, केशवनगरमधील महिलांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे. तसेच माजी नगरसेवक नरेंद्र चौधरी यांनी रस्त्याची दुरुस्ती न झाल्यास येत्या दोन दिवसात आंदोलन करू, असे सांगितले.
पालिका प्रशासनास धरले वेठीस
विप्रो कंपनीकडे जाणाऱ्या डंपरला अडवूून रास्ता रोको केला. पालिका प्रशासनास वेठीस धरले. येत्या दोन दिवसात रस्त्याची दुरुस्ती न झाल्यास यापेक्षाही तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा संतप्त महिलांसह नागरिकांनी पालिकेचे मुख्याधिकारी तुषार नेरकर यांना दिला आहे. याबाबत पालिकेने गंभीरतेने लक्ष देणे गरजेचे आहे. त्यानंतर मुख्याधिकारी तुषार नेरकर यांच्यासोबत एमजेपीचे अधिकारी चौधरी, अभियंता सचिन देसले यांनी रस्त्याची पाहणी केल्यावर येत्या दोन-तीन दिवसात रस्त्याचे काम पूर्ण केले जाईल, असे आश्वासन त्यांनी दिले.