साईमत, मुक्ताईनगर : प्रतिनिधी
मुक्ताईनगर विधानसभा मतदारसंघाचे माजी मंत्री आमदार एकनाथराव खडसे व विद्यमान शिंदे गटाचे आ.चंद्रकांत पाटील यांच्यामधील हाडवैर सर्वश्रुत आहे. माजी मंत्री खडसे यांचे कट्टर राजकीय विरोधक असलेले आ.पाटील यांची शुक्रवारी, १० मे रोजी महायुतीच्या उमेदवार खा.रक्षाताई खडसे यांनी दुपारी दोन वाजेच्या सुमारास आ.चंद्रकांत पाटील यांच्या निवासस्थानी येऊन त्यांची भेट घेतली. यावेळी प्रचार नियोजनाबाबत योग्य चर्चा झाली. याप्रसंगी खा.खडसे यांचे आ.पाटील यांच्या सौभाग्यवती यामिनी पाटील, संजना पाटील यांनी शाल, पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. दोघांमध्ये आखाजीच्या मुहुर्तावर ‘दिलजमाई’ झाल्याने आ.पाटील हे आता प्रचाराच्या शेवटच्या टप्प्यात सक्रीय होणार आहे.
आ.चंद्रकांत पाटील यांच्या मनधरणीसाठी काही दिवसांपूर्वीच मुक्ताईनगर येथे आलेले भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी आ.पाटील यांची भेट घेतली होती. त्यानंतर भुसावळ येथे महायुतीच्या उमेदवार रक्षाताई खडसे यांच्या प्रचार सभेसाठी आलेले महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचीही भुसावळ येथे आ.पाटील यांच्यासोबत भेट झालेली होती. तसेच ९ मे रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशाने पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनीही आ.चंद्रकांत पाटील आणि शिवसेनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते यांची बैठक घेतली. महायुतीच्या उमेदवार यांचा प्रचार करण्यासाठी सूचना केल्या.
आ.पाटील यांच्या निवासस्थानी गुरुवारी झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये महायुतीच्या उमेदवार रक्षाताई खडसे यांनी अद्यापही आ.पाटील यांची भेट घेतली नसल्याचा प्रश्न पालकमंत्र्यांना पत्रकारांनी विचारला होता. त्यामुळे शिवसैनिकांची खदखद होती. त्यावर पालकमंत्री यांनी शुक्रवारी रक्षाताई खडसे आ.पाटील यांची भेट घेणार असल्याचे सांगितले होते. दरम्यान, दोन्ही मान्यवरांनी मनोमिलन करत आगामी निवडणुकीत एकदिलाने काम करण्याचे संकेत दिले आहे.
यावेळी भाजपचे लोकसभा प्रमुख नंदकिशोर महाजन, तुषार राणे, शिवसेना उपजिल्हाप्रमुख छोटु भोई, अल्पसंख्याक प्रदेश उपाध्यक्ष अफसर खान, जिल्हा संघटक सुनील पाटील, तालुका प्रमुख नवनीत पाटील, पंकज राणे, नगरसेवक संतोष मराठे, बबलू कोळी, निलेश शिरसाठ, निलेश वानखेडे, आरिफ आझाद, गणेश टोंगे, स्वीय सहाय्यक प्रवीण चौधरी यांच्यासह शिवसेना, युवासेनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.