प्रोटोकॉलभंग, कामातील दिरंगाईवर अधिकाऱ्यांना धरले धारेवर; महावितरण-रेल्वे विभागावर ताशेरे
साईमत जळगाव प्रतिनिधी
जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवनात आयोजित जिल्हा विकास समन्वय व सहनियंत्रण समितीच्या (दिशा) बैठकीत आज प्रशासनाला चांगलेच धारेवर धरले गेले. केंद्र सरकारच्या योजनांच्या अंमलबजावणीत होणारी दिरंगाई, प्रोटोकॉलचे उल्लंघन आणि प्रलंबित कामांबाबत केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे यांनी संताप व्यक्त करत अधिकाऱ्यांची कानउघडणी केली. खासदार स्मिता वाघ यांनीही आक्रमक भूमिका घेत अधिकाऱ्यांना जाब विचारला.
महावितरणच्या प्रोटोकॉल उल्लंघनावर मंत्र्यांचा संताप
बैठकीत केंद्राच्या विविध योजनांचा आढावा घेत असताना महावितरण विभागाचा गंभीर प्रकार उघडकीस आला. केंद्र सरकारचा ६० टक्के निधी असलेल्या योजनेचे उद्घाटन केंद्रीय मंत्री आणि खासदारांना माहिती न देता एका आमदाराच्या मुलीच्या हस्ते पार पडल्याचे समोर आले.
या प्रकारावर रक्षा खडसे यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. “केंद्राचा पैसा असताना संबंधित मंत्र्यांना डावलून उद्घाटन कसे होऊ शकते? तुम्हाला प्रोटोकॉलचा विसर पडला आहे का?” असा सडेतोड सवाल करत त्यांनी महावितरणच्या अधिकाऱ्यांना भर बैठकीतच झापले. लोकप्रतिनिधींना अंधारात ठेवून कामकाज केल्यास ते सहन केले जाणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला.
वरणगाव रेल्वे पुलावरून रेल्वे अभियंत्यांची झाडाझडती
वरणगाव येथील रेल्वे पुलाचे काम अनेक दिवसांपासून रखडले आहे. या विलंबामुळे स्थानिक शेतकऱ्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. वारंवार पाठपुरावा करूनही कामात गती नसल्याने मंत्री खडसे यांनी रेल्वे विभागाच्या अभियंत्यांना जाब विचारला.
“एवढ्या छोट्या कामासाठी इतका विलंब का? तुम्ही दुसऱ्या देशात जाऊन तपासणी करताय का?” अशा बोचऱ्या शब्दांत त्यांनी नाराजी व्यक्त केली. प्रलंबित कामे तातडीने पूर्ण न झाल्यास गंभीर परिणामांना सामोरे जावे लागेल, असा स्पष्ट इशाराही त्यांनी दिला.
दिरंगाई खपवून घेतली जाणार नाही
बैठकीदरम्यान केंद्र सरकारच्या विविध योजनांच्या अंमलबजावणीचा सविस्तर आढावा घेण्यात आला. कामातील दिरंगाई, निधीच्या वापरातील त्रुटी आणि समन्वयाचा अभाव याबाबत लोकप्रतिनिधींनी अधिकाऱ्यांना थेट प्रश्न विचारले. विकासकामांमध्ये कोणतीही ढिलाई चालणार नाही, तसेच लोकप्रतिनिधींचा अनादर सहन केला जाणार नाही, अशी भूमिका यावेळी स्पष्ट करण्यात आली.
बैठकीला मान्यवरांची उपस्थिती
या बैठकीस जिल्हाधिकारी रोहन घुगे, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल करणवाल, महापौर दिपमाला काळे यांच्यासह विविध विभागांचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते. मंत्री आणि खासदारांच्या आक्रमक भूमिकेमुळे नियोजन भवनातील वातावरण काही काळ तणावपूर्ण झाले होते.
जिल्ह्यातील विकासकामांना गती देण्यासाठी आणि केंद्राच्या योजनांची प्रभावी अंमलबजावणी सुनिश्चित करण्यासाठी दिशा समिती अधिक सक्रिय राहणार असल्याचे या बैठकीतून स्पष्ट झाले. प्रशासनाने वेळेत कामे पूर्ण करून जनतेच्या अपेक्षा पूर्ण कराव्यात, हा ठाम संदेश यावेळी देण्यात आला.
