साईमत, जळगाव : प्रतिनिधी
किरण देवी सारडा सत्कार्य निधीतर्फे आयोजित कै.मामासाहेब दांडेकर यांच्या जन्मशताब्दीनिमित्त नुकत्याच घेण्यात आलेल्या ज्ञानेश्वरी स्पर्धेत कै. सुनिता जगन्नाथ वाणी भगीरथ इंग्लिश स्कूल शाळेतील ८५ विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. ही स्पर्धा परीक्षा ज्ञानेश्वरीच्या पाचव्या अध्यायावर आधारित घेण्यात आली. त्यात नाशिक, अमरावती, धुळे, नंदुरबार आणि जळगाव अशा पाच जिल्हा अंतर्गत स्पर्धेत शाळेतील राजश्री दिलीप खैरनार या विद्यार्थिनीने उत्तेजनार्थ क्रमांक मिळविला. तिला किरण देवी सारडा सत्कार्य निधी यांच्याकडून १ हजार रुपयाचे पारितोषिक धनादेश स्वरूपात देण्यात आले. याबद्दल शाळेचे ज्येष्ठ शिक्षक तथा शिक्षक पतपेढीचे मा. अध्यक्ष एस.डी.भिरूड यांच्या हस्ते राजश्रीला पारितोषिक आणि पुष्पवृक्ष भेट म्हणून देण्यात आले. यावेळी मुख्याध्यापिका सीमा वैजापूरकर, उपमुख्याध्यापिका प्रिया सफळे, पर्यवेक्षक निकम आणि मार्गदर्शक अलका पितृभक्त उपस्थित होते.
ज्ञानेश्वरी स्पर्धा परीक्षा ही गेल्या सहा वर्षांपासून घेतली जात आहे. यासाठी संस्कृत विषयाच्या शिक्षिका अलका पितृभक्त ह्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतात. स्पर्धेच्या माध्यमातून विद्यार्थी ज्ञानेश्वरीच्या ओव्या वाचन करतात. हाच संताबद्दलचा सार्थ अभिमान आहे. त्यांनी केलेली जन कल्याणाची तळमळ विद्यार्थ्यांना अणुरेणु कळेल, हीच एक आशा अलका पितृभक्त यांनी व्यक्त केली. परीक्षेसाठी आशिष पाटील, रूपाली कोठावदे, तनुजा चौधरी यांचे सहकार्य लाभले. राजश्रीच्या यशाबद्दल शाळेतील सर्व शिक्षक, शिक्षिका, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी कौतुक केले आहे.