तज्ज्ञांकडून विद्यार्थ्यांना एचआयव्ही, एड्स नियंत्रणावर मार्गदर्शन
साईमत/जळगाव/प्रतिनिधी :
शहरातील मेहरुणमधील रामेश्वर कॉलनीतील स्थित किड्स झोन प्रि-स्कुल, राज प्राथमिक-माध्यमिक शाळा आणि डॉ. सुनीलभाऊ महाजन ज्युनिअर कॉलेजमध्ये जळगाव जिल्हा एड्स नियंत्रण व प्रतिबंध विभागातर्फे इंटेन्सिफाईड आयईसी कॅम्पेन अंतर्गत संवेदीकरण कार्यक्रम नुकताच पार पडला.
कार्यक्रमात रुपाली दीक्षित, मनीषा वानखेडे, निशिगंधा बागुल, दीपक धनगर यांनी विद्यार्थ्यांना किशोरवयीन जीवन कौशल्य, किशोरावस्था व वाढते वय, पौगांडावस्थेतील प्रजननक्षम व लैंगिक आरोग्य, मानसिक आरोग्य समस्या, मादक पदार्थांचा दुरुपयोग तसेच एचआयव्ही, एड्स नियंत्रणाबाबत मार्गदर्शन केले.
तज्ज्ञ मार्गदर्शकांनी विद्यार्थ्यांच्या शंकांचे निरसन करून त्यांना योग्य माहिती दिल्यामुळे कार्यक्रमातून त्यांच्या सामाजिक, मानसिक आणि शारीरिक आरोग्याबाबत जागरूकता निर्माण झाली. यशस्वीतेसाठी शाळेचे शिक्षक विकास नेहते, सरला झांबरे, सरोज पाटील यांनी परिश्रम घेतले.