साईमत, पुणे : प्रतिनिधी
राज्यात दडी मारलेला पाऊस पुन्हा सक्रिय झाला आहे. राज्यातल्या बहुतांश भागांत महिन्याभरात पाऊस असेल अशी शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे. हवामान खात्याने दिलेल्या ताज्या माहितीनुसार, नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगावसह २९ जिल्ह्यांना पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला आहे तर रत्नागिरीत मात्र पावसाचा ऑरेंज असणार आहे. यामुळे नागरिकांनी हवामानाचा अंदाज घेत बाहेर पडावं तर शेतकऱ्यांनीही पावसाचा अंदाज घेत शेतीच्या कामांना सुरुवात करावी, अशा सूचना देण्यात आल्या आहेत. भारतीय हवामान विभागाने गुरुवारी नोंदवलेल्या अंदाजानुसार, पुढील ४ आठवड्यांच्या अंदाजानुसार, ८ ते १४ सप्टेंबर या कालावधीत कोकण, उत्तर मध्य महाराष्ट्र, मराठवाड्याचा काही भाग आणि विदर्भाच्या काही भागात पावसाची शक्यता आहे. १५ ते २१ सप्टेंबर या कालावधीत कोकण विभाग, विदर्भाचा काही भाग येथे पाऊस पडू शकतो. २२ ते २८ सप्टेंबर आणि २९ सप्टेंबर ते ५ ऑक्टोबर या कालावधीत सरासरीइतक्या पावसाचा अंदाज आहे.
हतनुर धरणातून ७५८९२ क्युसेस
भुसावळ : तालुक्यातील तापी नदीवर असलेल्या मुक्ताई सागर (हतनूर) धरणाच्या म्हणजेच तापी आणि पूर्णा नदीच्या पाणलोट क्षेत्रात पाऊस झाल्याने धरणाचे १८ दरवाजे शनिवारी सकाळी दीड मीटरने उघडण्यात आले आहेत. धरणाचे अभियंता शशिकांत चौधरी यांनी दिलेल्या माहितीनुसार तापी आणि पूर्णा नदीच्या पाणलोट क्षेत्रात पाऊस झाल्यामुळे शनिवारी मुक्ताई सागर धरणाच्या पातळीत वाढ झाली. सकाळी नऊ वाजता धरणाचे १८ दरवाजे दीड मीटरने उघडण्यात आले आहेत. धरणाच्या पाणी पातळीत वाढ झाल्याने धरणातून ७५८९२ क्युसेस एवढा विसर्ग तापी नदीपात्रात सोडण्यात येत आहे.