Rainbow Youth Festival : जळगाव विद्यापीठात इंद्रधनुष्य युवक महोत्सव बुधवारपासून

0
4

२६ विद्यापीठांच्या १४०० विद्यार्थ्यांचा सहभाग ; पालकमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन

साईमत/जळगाव/प्रतिनिधी :  

कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात आयोजित एकविसाव्या महाराष्ट्र राज्य आंतरविद्यापीठ ‘इंद्रधनुष्य युवक महोत्सव’ २०२५ स्पर्धेचे उद्घाटन ‍बुधवारी, ५ नोव्हेंबर रोजी सकाळी ११ वाजता राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून राज्याचे जलसंपदा तथा आपत्ती व्यवस्थापन मंत्री ना. ‍गिरीष महाजन, सिनेअभिनेत्री तथा ‘चला हवा येऊ द्या’ फेम श्रेया बुगडे उपस्थित राहतील. अध्यक्षस्थानी कुलगुरू प्रा. व्ही.एल. माहेश्वरी असतील. यावेळी प्र-कुलगुरू प्रा. एस.टी. इंगळे, कुलसचिव डॉ.विनोद पाटील उपस्थित राहतील. यावेळी मान्यवरांसह विद्यापीठाच्या विविध प्राधिकरणाचे सदस्य, विविध समितीचे सदस्य, सहभागी विद्यापीठांचे विद्यार्थी व संघ व्यवस्थापक उपस्थित राहतील. उद्घाटन सत्रापूर्वी सकाळी ९ वाजता शोभायात्रेद्वारे महाराष्ट्रातील विविध संस्कृतीचे दर्शन घडणार आहे.

कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात एकविसाव्या महाराष्ट्र राज्य आंतरविद्यापीठ ‘इंद्रधनुष्य युवक महोत्सवा’चे भव्य आयोजन विद्यापीठात ५ ते ९ नोव्हेंबर या कालावधीत आयोजन केले आहे. महोत्सवाची तयारी पूर्ण झाली असून सायंकाळपर्यंत काही विद्यापीठांच्या संघानी नोंदणी केली तर रात्री उशिरापर्यंत राज्यभरातील अन्य विद्यापीठांचे संघ दाखल झाले आहेत. राज्यातील २६ विद्यापीठातील १४०० विद्यार्थी, संघव्यवस्थापक सहभागी होत आहेत. महोत्सवात विविध कलांचा अविष्कार होणार आहे.यासाठी पाच रंगमंचाची व्यवस्था केली आहे.

‘इंद्रधनुष्य युवक महोत्सवा’त ५ प्रकारच्या स्पर्धा आयोजित केल्या आहेत. महोत्सवानिमित्त विद्यापीठ परिसरात केलेल्या आकर्षक विद्युत रोषणाईने झगमगाट दिसत आहे. त्यात संगीत विभागात भारतीय शास्त्रीय गायन, भारतीय शास्त्रीय वाद्य संगीत (तालवाद्य,स्वर वाद्य) नाट्यसंगीत, भारतीय सुगम संगीत, भारतीय समूह गान, भारतीय लोकसंगीत वाद्यवृंद, पाश्चिमात्य गायन, पाश्चिमात्य वाद्य संगीत, पाश्चिमात्य समूह गान, नृत्य विभागात-भारतीय शास्त्रीय नृत्य, भारतीय लोकसमूह नृत्य, वाड्मयीन कलाप्रकार-वकृत्व वादविवाद स्पर्धा, प्रश्नमंजुषा, रंगमंचीय कला प्रकार -एकांकिका, प्रहसन, मूकअभिनय, नक्कल, लघुपट, ललित कला प्रकारात – स्थळ चित्र, चिकट कला, पोस्टर मेकिंग, माती कला, व्यंगचित्रे, रांगोळी, स्थळ छायाचित्रण, इन्स्टॉलेशन अशा कला प्रकारांचा समावेश आहे. यशस्वीतेसाठी व्यवस्थापन परिषद सदस्य, अधिसभा सदस्य, विद्यापरिषद सदस्य, कुलसचिव, प्राचार्य, शिक्षक व शिक्षकेत्तर अधिकारी, कर्मचारी परिश्रम घेत आहेत.

बुधवारी, ५ नोव्हेंबरला सादर होणारे कार्यक्रम

रंगमंच क्र. १ राष्ट्र कवी बंकीमचंद्र चटोपाध्याय रंगमंच (दीक्षांत सभागृह) येथे ५ नोव्हेंबर, २०२५ रोजी भारतीय लोकसंगीत वाद्यवृंद कला प्रकाराच्या स्पर्धेसाठी दु. ३ ते रात्री १० वाजेपर्यंत विविध विद्यापीठांचे कलावंत विद्यार्थी सादरीकरण करतील, अशी माहिती महोत्सवाचे आयोजन सचिव तथा संचालक विद्यार्थी विकास विभाग डॉ. जयेंद्र लेकुरवाळे यांनी दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here