कासोदा पोलिसात गुन्हा दाखल
साईमत/जळगाव/प्रतिनिधी :
जिल्ह्यातील कासोदा पोलिसांनी एका मोठ्या जुगार अड्ड्यावर छापा टाकून सात जुगारींना अटक केली आहे. कारवाईत पोलिसांनी १ लाख ६६ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. ही कारवाई कासोदा गावाजवळच्या बांभोरी शिवारात गुरूवारी, ११ सप्टेंबर रोजी दुपारी साडे चार वाजेच्या सुमारास करण्यात आली. कारवाईमुळे परिसरातील अवैध धंद्यांना मोठा धक्का बसला आहे. दरम्यान, जुगाऱ्यांकडून ३ हजार ३८० रुपये रोख, २२ हजार रुपयांचे मोबाईल फोन आणि १ लाख ४० हजार रूपयांच्या तीन मोटरसायकली असा १ लाख ६६ हजार ३० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. याप्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल समाधान तोंडे यांच्या तक्रारीवरून कासोदा पोलिसात गुन्हा दाखल केला आहे.
सविस्तर असे की, कासोदा पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक निलेश राजपूत यांना बांभोरी शिवारात, गालापूर रस्त्यावरील फैजल शेख यांच्या शेतात काही जण जुगार खेळत असल्याची गोपनीय माहिती मिळाली होती. त्या माहितीच्या आधारे त्यांनी तात्काळ पोलीस नाईक अखिल मुजावर, पोलीस कॉन्स्टेबल समाधान तोंडे, प्रशांत पगारे, कुणाल देवरे आणि योगेश पाटील यांचे पथक तयार करून कारवाईसाठी रवाना केले. पोलिसांनी सापळा रचून गालापूर रस्त्याजवळच्या नाल्याकाठी काही जण जमिनीवर घोळका करून पत्त्यांचा जुगार खेळत असल्याचे पाहिले. त्यानंतर, पोलिसांनी अचानक छापा टाकत जुगाऱ्यांना रंगेहाथ पकडले.
जुगाऱ्यांमध्ये सात जणांचा समावेश
पोलिसांनी केलेल्या कारवाईत सात आरोपींना अटक केली. त्यात शेख फारुख शेख नबी (वय ५०), शेख शहीद शेख रफिक (वय ४०), शेख निजाम शेख सिराज (वय ५२), तस्लीम सुलेमान खान (वय ५७), शेख हमीद शेख शौकत (वय ४३), शेख हमीद शेख अमीर (वय ४०) आणि शेख मुस्ताक खान अमीर खान (वय ६०) यांचा समावेश आहे. सर्व आरोपी कासोदा, ता. एरंडोल येथील रहिवासी आहेत. ही कारवाई पोलीस अधीक्षक डॉ.महेश्वर रेड्डी यांच्या आदेशानुसार अपर पोलीस अधीक्षक कविता नेरकर-पवार, उपविभागीय पोलीस अधिकारी विजय ठाकुरवाड यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.