रासेयोच्या स्वयंसेवकांनी समाजसेवेचे व्रत अंगी बाणावे

0
8

साईमत, मुक्ताईनगर : प्रतिनिधी

मुक्ताबाई पालखी सोहळ्यातील वारकऱ्यांची सेवा करून वारीप्रसंगी ‘निर्मल वारी, हरित वारी, प्लास्टिक, कचरा मुक्त वारी’ अभियानात सहभागी होण्याचे आवाहन करून स्वयंसेवकांनी आपल्या जीवनात समाजसेवेचे व्रत अंगी बाणावे, अशी अपेक्षा व्यक्त केली. त्याचबरोबर युवकच देशाच्या सर्वांगीण विकासात हातभार लावू शकतात, असा विश्‍वास डॉ. सचिन नांद्रे (रासेयोचे संचालक, क.ब.चौ.उ.म.वि, जळगाव) यांनी व्यक्त केला.

मुक्ताई मंदिर कोथळी येथे कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव राष्ट्रीय सेवा योजना विभाग व खडसे महाविद्यालय, आणि संत मुक्ताबाई महाविद्यालय, मुक्ताईनगर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित मुक्ताई पालखीच्या पंढरपूरकडे प्रस्थान होणाऱ्या सोहळ्यामध्ये वारकऱ्यांची सेवा करण्यासाठी आणि ‘निर्मल वारी, हरित वारी, प्लास्टिक, कचरा मुक्त वारी’ हा संदेश पोहोचविण्यासाठी व्याख्यानातून उपस्थित रासेयोच्या स्वयंसेवकांना मार्गदर्शन करतांना ते बोलत होते.

याप्रसंगी रासेयोचे जिल्हा समन्वयक डॉ. दिनेश पाटील यांनी मनोगतातून स्वयंसेवकांनी आपल्या सभोवतालचा परिसर स्वच्छ ठेवून पर्यावरण संरक्षणाचे कार्य हाती घ्यावे, असे आवाहन केले. याप्रसंगी प्राचार्य डॉ. जे.बी. अंजने (ऐनपूर, महाविद्यालय), रासेयोचे विभागीय समन्वयक डॉ.नेहते, औटी नाना (रासेयो सहाय्यक, क.ब.चौ.उ.म.वि, जळगाव) उपस्थित होते.
उपक्रमात खडसे महाविद्यालयाचे ५३ स्वयंसेवक उस्फूर्तपणे सहभागी झाले होते. त्यांनी वारीप्रसंगी उपस्थित वारकऱ्यांची सेवा करून मंदिर परिसरातील स्वच्छता केली. तसेच वारकऱ्यांना प्लास्टिक मुक्त, कचरा मुक्त वारी करण्याचे आवाहन करून त्यांना ‘निर्मल वारी, हरित वारी’ असा संदेश आपल्या कृतीतून दाखवून दिला. याप्रसंगी खडसे महाविद्यालयातर्फे वारीतील वारकऱ्यांसाठी पाच हजार केळीची पाने जेवणासाठी उपलब्ध करून दिली होती.

याप्रसंगी खडसे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. हेमंत महाजन यांनी मनोगतातून उपस्थितांना स्वच्छतेचा बाणा अंगी बाळगण्याचे आवाहन केले. तसेच संत मुक्ताबाई महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.आय. डी.पाटील यांनी मनोगतातून स्वयंसेवकांना वारकऱ्यांची निस्वार्थीपणे सेवा करण्याचा संदेश दिला. सूत्रसंचालन प्रा. डॉ. दीपक बावस्कर तर आभार प्रा.डॉ.व्ही.बी.डांगे यांनी मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here