पाचोरा पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल
साईमत/पाचोरा/प्रतिनिधी :
गावातील गाव नमुना आठ ‘अ’मध्ये नाव लावण्यासाठी १० हजारांची लाच घेणाऱ्या खडकदेवळा येथील सरपंचासह पंटरला जळगाव येथील लाचलुचपत विभागाच्या पथकाने रंगेहात पकडले आहे. सरपंच अनिल विश्राम पाटील (वय ४६ ) आणि खासगी पंटर बलराम हेमराज भील (वय ४६, दोन्ही रा. खडकदेवळा बु., ता.पाचोरा) अशी अटक केलेल्या संशयित आरोपींची नावे आहेत. दरम्यान, याप्रकरणी पाचोरा पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल केला आहे.
सविस्तर असे की, तक्रारदार हे पाचोरा तालुक्यातील खडकदेवळा येथील रहिवाशी आहेते. तक्रारदार यांना प्रधानमंत्री आवास योजना अंतर्गत घरकुल मंजूर झाले असून तक्रारदार राहत असलेली जागा ही त्यांच्या नावावर नसल्याने त्यांच्या नावावर गाव नमुना आठ ‘अ’मध्ये नावे लावण्यासाठी काम ग्रामसेवक यांच्याकडून करून घेण्याचा मोबदल्यात सरपंच अनिल पाटील यांनी शुक्रवारी, २७ सप्टेंबर रोजी १० हजार रूपयांची लाच मागणी केल्यानंतर तक्रार नोंदविण्यात येऊन पडताळणी करण्यात आली. सायंकाळी ७ वाजेच्या सुमारास खासगी पंटराकडे लाच देण्याचे सरपंचांनी सांगितल्यानंतर दोघांना अटक केली आहे.
यांनी केली कारवाई
ही कारवाई एसीबीचे पोलीस उपअधीक्षक योगेश ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक स्मिता नवघरे, दिनेशसिंग पाटील, राकेश दुसाने तसेच पोलीस निरीक्षक नेत्रा जाधव, हवालदार रवींद्र घुगे, सुनील वानखेडे, शैला धनगर, किशोर महाजन, बाळू मराठे, प्रणेश ठाकुर, अमोल सूर्यवंशी यांनी केली आहे.