साईमत, चाळीसगाव : प्रतिनिधी
राज्य सरकारने चाळीसगाव तालुका नुकताच दुष्काळग्रस्त म्हणून जाहीर केला आहे. शहरातील विमानतळ भागातून लेआऊटच्या ठिकाणी असलेल्या विहिरीतून अमर्याद पाणी उपसा सुरु केला आहे. म्हणून या भागातील विहिरीतून टँकरद्वारे होणारा पाणी उपसा थांबवावा, अशी मागणी या भागातील नागरिकांनी दैनिक ‘साईमत’च्या माध्यमातून केली आहे.
यंदाचे वर्ष दमदार पाऊस न झाल्यामुळे दुष्काळग्रस्त ठरले आहे. त्यामुळे नळाला पाच दिवसांनी पाणी येते. त्यातच जमिनीत पाणी शिल्लक नाही. बारा, तेरा हजार लिटरचे पाणी टँकरने एमआयडीसीतील एका नामांकित ठिकाणी पाणी पुरवठा केला जात असल्याची चर्चा आहे. ह्या विहिरीतून पाण्याचा उपसा रात्री केला जातो. आधीच चाळीसगाव तालुक्यात पाऊस न झाल्यामुळे दुष्काळ आहे. त्यात या भागात रहिवाशी बोअरिंगच्या पाण्यावर कसेतरी दिवस काढत आहे. जमिनीतील पाण्याची पातळी कमी झाली तर ‘दुष्काळात तेरावा महिना’ अशा म्हणीप्रमाणे या भागातील रहिवाश्यांवर वेळ नाही आली पाहिजे, अशी नागरिकांनी अपेक्षा व्यक्त केली आहे.