साईमत, अमळनेर : प्रतिनिधी
येथील सानेगुरुजी विद्या मंदिरात लेखिका दर्शना पवार लिखित ‘लढणाऱ्यांचे बळ रमाई’ पुस्तकाचे प्रकाशन रमाई जयंतीनिमित्त विद्यार्थिनी विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत करण्यात आले. यावेळी विविध शाळेतील विद्यार्थिनींना रमाई पुस्तकांचे मोफत वितरण करण्यात आले.
रमाई जयंतीनिमित्त साने गुरुजी विद्यालय येथे आयोजित कार्यक्रमांमध्ये चेतश्री प्रकाशन संस्थेचे प्रकाशक चेतन सोनार, विद्रोही साहित्य संमेलनाचे निमंत्रक रणजीत शिंदे आणि युवा नाट्य कलावंत भूमिका घोरपडे यांच्या हस्ते रमाई पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. रमाई जयंतीनिमित्त श्रीमती प्रतिभा प्रकाश शिदिड यांच्या दातृत्वातून पुस्तकाचे वितरण साने गुरुजी विद्यालय अमळनेर, मंगरूळ हायस्कूल व रणाईचे आश्रमशाळा तसेच रमाई ढोल पथकाच्या विद्यार्थिनीं व महिलांना मोफत करण्यात आले.
सानेगुरुजी विद्यालय येथे प्रास्ताविकात बदलत्या काळातही रमार्इंची जीवन हे लढणाऱ्यांसाठी बळ देत राहील, असे लेखिका दर्शना पवार यांनी सांगितले. सामाजिक कार्यकर्ते रणजित शिंदे यांनी उपस्थित विद्यार्थिनी, विद्यार्थी यांना मार्गदर्शन करताना रमाई व डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्यातील संवादाच्या आधारे अडचणीच्या काळात केलेल्या मदतीच्या बदल्यात मोबदल्याची अपेक्षा करू नये, अन्यथा केलेली मदत व्यर्थ ठरते, असे रमाबार्इंच्या जीवनातील आदर्श व जीवनाला प्रेरणा देणाऱ्या गोष्टी मुलांच्या लक्षात आणून दिल्या. चेतन सोनार यांनी विद्यार्थ्यांना वाचनाचे आवाहन करत महामानवांच्या जीवनातील विविध घटना, प्रसंग वाचनाने आपले व्यक्तिमत्वही संपन्न होते, असे सांगितले.
यावेळी अमळनेर शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव संदीप घोरपडे यांनी विद्यार्थ्यांनी आपल्याला मिळालेले अभिव्यक्ती स्वातंत्र्य जपण्यासाठी संघर्ष करतांना महामानवाच्या जीवनाचा अभ्यास करावा, असे सांगितले. यशस्वीतेसाठी साने गुरुजी विद्यालयाच्या मुख्याध्यापिका अनिता बोरसे, सुनील पाटील, मंगरूळ हायस्कुलचे मुख्याध्यापक प्रकाश पाटील, रणाईचे माध्यमिक शाळेचे मुख्याध्यापक महेंद्र नेरपगार, रमाई ढोल पथकाच्या प्रमुख अनिता संदानशिव यांनी परिश्रम घेतले.