साईमत : जळगाव : प्रतिनिधी
मू. जे. महाविद्यालयातील मानसशास्त्र विभागातर्फे जागतिक आत्महत्या प्रतिबंध दिवसानिमित्त जनजागृती पर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले. यावेळी डॉ. रागिब अहमद यांनी व्याख्यानात आत्महत्यांचे कारणे मीमांसा विषद केली. 2018 ते 2022 वर्षात जळगाव जिल्ह्यात 2975 इतक्या आत्महत्या झाल्या ही खूप गांभीर्याची बाब असून त्यांवर उपाययोजना उभी करणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले.
डॉ. रागिब अहमद यांनी सांगितले की, आज आपण सामाजिक बांधिलकी पासून दूर गेलो, कौटुंबिक संस्था उध्वस्त होत गेल्या, मित्रा पासून दूर जात आहे, व्यक्ती विभक्त कुटुंब पद्धतीत वावरत आहेत व स्वतः कुटुंबापासून सुद्धा दूर जात आहे, त्यामुळे त्याच्या भावनां व्यक्त होत नाही किंवा भावना व्यक्त करण्यासाठी त्याला जागा नाही. त्यामुळे तो तीव्र चिंता नैराश्यात जातो, यातून त्याला बाहेर पडणे कठीण होते म्हणून तो आत्महत्येचा मार्ग निवडतो.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. बालाजी राऊत यांनी केले त्यात त्यांनी विद्यार्थ्यांवरील वाढता ताण तणाव, विद्यार्थ्याच्या वाढत्या आत्महत्या व कारणे यावर प्रकाश टाकला, विद्यार्थ्यांमधून डॉ. प्रीती पाटील यांनी मनोगत व्यक्त केले. मानसशास्त्र विभाग प्रमुख डॉ ललिता निकम यांनी आभार व्यक्त केले. कार्यक्रमात महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी प्रश्न- उत्तर चर्चेत सक्रिय सहभाग घेतला.