चाळीसगावला डेंग्यू दिनानिमित्त रॅली काढून जनजागृती

0
62

साईमत, चाळीसगाव : प्रतिनिधी

तालुक्यातील सर्व प्राथमिक आरोग्य केंद्र आणि अंतर्गत उपकेंद्रात तसेच शहरी भागात राष्ट्रीय डेंग्यू दिवस ‘समुदायाच्या संपर्कात रहा, डेंग्यूला नियंत्रित करा’ या घोषवाक्याला आधार मानून विविध उपक्रम राबवून साजरा करण्यात आला. जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.सचिन भायेकर, जिल्हा हिवताप अधिकारी डॉ.तुषार देशमुख, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.किरण पाटील यांच्या आदेशानुसार संपूर्ण जळगाव जिल्ह्यात राष्ट्रीय डेंग्यू दिन १६ मे रोजी विविध आरोग्यपर उपक्रम राबवून साजरा करण्यात आला.

त्याचाच एक भाग म्हणून वैद्यकीय अधीक्षक डॉ.मंदार करंबेळकर, तालुका आरोग्य अधिकारी डॉ.प्रशांत पाटील, वैद्यकीय अधिकारी डॉ.वैदेही पंडित यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच सर्वच वैद्यकीय अधिकारी यांच्या सहकार्याने चाळीसगाव तालुक्यातील सर्वच प्रा.आ.केंद्र आणि अंतर्गत गावात तसेच शहरी भागात राष्ट्रीय डेंग्यू दिवस डेंग्यू, हिवताप, चिकूनगुनिया, हत्तीरोग आदी कीटकजन्य आजाराविषयी आरोग्य सहायक, आरोग्य सेवक, आरोग्य सेविका, आशा आदी कर्मचाऱ्यांमार्फत हस्तपत्रिका वाटप करून आरोग्य शिक्षण देण्यात आले. गटसभा घेण्यात आल्या. रॅली काढून डेंग्यू आजाराविषयी घोषणा देऊन जनजागृती करण्यात आली.

चाळीसगाव शहरातील शहरी प्रा.आ.केंद्र येथे राष्ट्रीय डेंग्यू दिन या कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते श्री धन्वंतरी देवता प्रतिमा पूजन करून करण्यात आली. नंतर अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि प्रमुख मान्यवर यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाला आशा वर्कर, आरोग्य सेविका, आरोग्य सेवक, नागरिक उपस्थित होते.

डेंग्यू आजाराला प्रतिबंध करण्यासाठी नागरिकांनी साठविलेल्या पाण्याचे योग्यप्रकारे व्यवस्थापन करावे, डासांच्या उत्पत्तीची ठिकाणे निर्माण होऊ देऊ नये. तसेच आवश्‍यक दक्षता बाळगावी, असे आवाहन वैद्यकीय अधिकारी डॉ.प्रमोद सोनवणे यांनी केले. ग्रामीण रुग्णालय येथील वैद्यकीय अधीक्षक डॉ.मंदार करंबेळकर यांनी सर्व कीटकजन्य आजाराविषयी माहिती देवून उपस्थितांना महत्वपूर्ण मार्गदर्शन केले. आरोग्य सेवक सी.एल.चौधरी यांनी राष्ट्रीय डेंग्यू दिन साजरा करण्यामागचा उद्देश स्पष्ट केला.

कार्यक्रमासाठी वैद्यकीय अधिकारी श्रीमती डॉ.खैरनार, विस्तार अधिकारी प्रदीप सोनवणे, आरोग्य पर्यवेक्षक किरण बेलदार, आरोग्य सहायक ममराज राठोड यांचे मार्गदर्शन लाभले. तसेच जिल्हा हिवताप कार्यालय जळगाव, ग्रामीण रुग्णालय, चाळीसगाव तसेच तालुका आरोग्य अधिकारी कार्यालय, चाळीसगाव येथील सर्व अधिकारी व सहकारी कर्मचारी मित्र यांचे सहकार्य लाभले.

शेवटी आरोग्य कर्मचारी दीपक ठाकरे, विकास सोनवणे, सी.एल.चौधरी, आर.बी.सूर्यवंशी यांच्यामार्फत बस स्टॉप परिसरात डेंग्यू आजाराविषयी नागरिक, प्रवाशांना हस्त पत्रिका वाटप करून आरोग्याविषयी शिक्षण देण्यात आले. सूत्रसंचालन तथा आभार आरोग्य सेवक दीपक ठाकरे यांनी मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here