निषेधासह बेमुदत सेवाबंदीचा इशारा, शासनाला निवेदन सादर
साईमत/जळगाव/प्रतिनिधी :
रुग्णांच्या सुरक्षेला धोका निर्माण करणाऱ्या शासनाच्या निर्णयाविरोधात इंडियन मेडिकल असोसिएशनतर्फे (आयएमए) राज्यव्यापी आंदोलन राबविण्यात आले. आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर गुरुवारी, १८ सप्टेंबर रोजी सकाळी ८ वाजेपासून जिल्ह्यातील नियमित तसेच आपत्कालीन वैद्यकीय सेवा बंद ठेवण्यात आल्या. यासंदर्भात आयएमएच्या पदाधिकाऱ्यांसह सर्व डॉक्टरांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. तेथे जाऊन निवासी जिल्हाधिकारी जयश्री माळी यांना आंदोलनाची कारणमीमांसा स्पष्ट करणारे निवेदन सादर केले.
शहरातील आयएमएच्या सभागृहात डॉक्टरांची विशेष बैठक घेण्यात आली. बैठकीत शासनाच्या अधिसूचनेविरोधातील भूमिका स्पष्ट करत अध्यक्ष डॉ. शशिकांत गाजरे, सचिव डॉ. भरत बोरोले, डॉ. स्नेहल फेगडे, डॉ. विलास भोळे, डॉ. सुनील गाजरे यांनी आंदोलनाचे समर्थन केले.
शासनाने तातडीने गांभीर्याने लक्ष द्यावे
रुग्णांच्या आरोग्याला धोका टाळण्यासाठी आणि वैद्यकीय सेवांची शुद्धता टिकविण्यासाठी आंदोलनाचा मार्ग अवलंबावा लागला. मात्र, शासनाने याकडे तातडीने गांभीर्याने लक्ष दिले नाही तर आगामी काळात बेमुदत वैद्यकीय सेवा बंद आंदोलन करण्याचा इशारा आयएमएने शासनाला दिला आहे.
