साईमत, वाकोद, ता. जामनेर : वार्ताहर
मराठा समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे, या मागणीसाठी जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यात आंतरवाली सराटी येथे मराठा समाजाचे प्रतिनिधी उपोषण करत होते. याठिकाणी शुक्रवारी,१ सप्टेंबर रोजी सायंकाळी पोलिसांनी लाठीमार करत हवेत गोळीबार केला. या घटनेचा वाकोद येथील सकल मराठा समाजाच्यावतीने राज्य सरकारच्या विरोधात घोषणा देत तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला.
मराठा समाजाचे शांततापूर्ण सुरू असलेले उपोषण पोलिसांनी अमानुष पद्धतीने दडपण्याचा प्रयत्न केला आहे. त्याचा निषेध करण्यासाठी वाकोदमधील सकल मराठा समाजाच्यावतीने गावातून निषेध मोर्चा काढण्यात आला. यावेळी ‘छत्रपती शिवाजी महाराज की जय’, ‘एक मराठा लाख मराठा’, ‘या सरकारचं करायचं काय, खाली डोकं वर पाय’, मराठ्यांना आरक्षण मिळालेच पाहिजे’ अशा घोषणा देत राज्य सरकारचा निषेध करण्यात आला.
मोर्चाचे रूपांतर झाले सभेत
छ. शिवाजी महाराज चौकात मोर्चाचे रूपांतर सभेत झाले. यावेळी ॲड. ज्ञानेश्वर राऊत, सोपान गाढवे (पाटील), संजय सपकाळ यांनी मनोगत व्यक्त केले. सर्वांनी शिंदे- फडणवीस सरकारवर जोरदार टीका करत मराठा आरक्षण कार्यकर्त्यांवरील हल्ल्याचा सकल मराठा समाजातर्फे तीव्र निषेध व्यक्त केला. यावेळी रामा भारुड, संजय देठे, रवींद्र भगत, राजू काळे, सरपंच संजय सपकाळे, सुनील धामोडे, देवा आगळे, युनूस शेख (माईकल भाई), सागर जाधव, कृष्णा भगत, योगेश कुरंगे, गणेश शिरसाठ, बारकू शिरसाठ, अविनाश काळे, संतोष मराठे, शांताराम काळे यांच्यासह समाज बांधव उपस्थित होते.
