बेंडाळे महिला महाविद्यालयात प्रा. डॉ. नीता जाधव यांचे प्रतिपादन
साईमत/जळगाव/प्रतिनिधी :
स्त्रीया शिक्षित होऊन आर्थिकदृष्ट्या सक्षम झाल्या तर त्या स्वतःच्या न्याय व हक्कांसाठी बंडाचा मार्ग अवलंबण्याऐवजी समन्वयातून समाजात लिंगभाव समानता प्रस्थापित करण्यात महत्त्वाची भूमिका निभावू शकतात. त्यासाठी स्त्रियांनी स्वतः आपल्या स्वतःच्या तसेच कौटुंबिक आणि सामाजिक पर्यायाने राष्ट्राच्या चारित्र्याचा सांभाळ केला पाहिजे.स्त्री-पुरुष समता जोपासून सामाजिक आरोग्य आनंददायी होईल आणि राष्ट्राच्या प्रगतीसाठी समर्थपणे हातभार लागेल, असे प्रतिपादन डॉ. नीता जाधव यांनी केले. जळगाव येथील डॉ. अण्णासाहेब जी.डी. बेंडाळे महिला महाविद्यालयात (स्वायत्त) इंग्रजी विभागाच्यावतीने ‘लिंग समभाव व संवेदनशीलता’ विषयावर त्यांचे व्याख्यान आयोजित केले होते. त्यावेळी त्या बोलत होत्या. अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. सत्यजित साळवे होते. व्याख्यानाला विद्यार्थिनींचा उत्स्फूर्त सहभाग लाभला.
डॉ.जाधव यांनी व्याख्यानात जेंडर इक्वलिटी, इक्विटी, सेंसिटायझेशन आणि सेंसिटीव्हिटी या संकल्पना विस्तृतपणे विशद केल्या. विविध क्षेत्रांशी निगडीत मार्मिक उदाहरणांसह त्यांनी जेंडर (लिंग) या शब्दाचा सापेक्ष अर्थ उलगडून सांगितला. समाजाने किंवा व्यवस्थेने स्त्रियांना हेतू पुरस्सर कसे दुय्यम स्थान दिले आहे हे स्पष्ट करताना त्यांनी जेंडर या संकल्पनेचा सामाजिक आणि सांस्कृतिक अर्थ डॉ. नीता जाधव यांनी उलगडला.
मुलींना स्वत:च्या उद्धारासाठी पुढे येण्याचे आवाहन
स्त्रियांनी स्वतःच्या अस्तित्वासाठी स्वतः पुढे आले पाहिजे. त्यासाठी त्यांना शिक्षण घेऊन आर्थिक स्वावलंबनासह सिद्ध व्हावे लागेल. महात्मा ज्योतिराव फुले, सावित्रीमाई फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यासारख्या महापुरुषांनी महिलांसाठी केलेल्या सामाजिक सुधारणा चळवळी तसेच संवैधानिक कायद्याचा दाखला दिला. आपल्या स्वरचित कवितेच्या माध्यमातून मुलींना स्वतःचा उद्धार करण्यासाठी स्वतःच आता पुढे आले पाहिजे, असे उपप्राचार्य डॉ. सत्यजित साळवे यांनी आवाहन करुन प्रेरणा दिली. यशस्वीतेसाठी इंग्रजी विभागातील प्रा. सुनील अहिरे, मिताली अहिरे, नयना पाटील, अमृता नेतकर यांनी परिश्रम घेतले. सूत्रसंचालन प्रा. योगिता सोनवणे यांनी केले.
