संत गजानन महाराज मंदिरात अभिषेक करण्यात आले.
साईमत/मुक्तईनगर /प्रतिनिधी :
शहरातील संत गजानन महाराज संस्थान व ज्येष्ठ नागरिक संघ यांच्या संयुक्त विद्यमाने संत गजानन महाराज यांची पुण्यतिथी उत्साहात साजरी करण्यात आली.यानिमित्त सकाळी भुसावळ रोड वरील संत गजानन महाराज मंदिरात अभिषेक करण्यात आले. दुपारी मंदिराचे सेवक दीपक पाटील यांनी फकिरा बोरे यांच्याहस्ते सपत्नीक आरती केली व महाप्रसादाचे वाटप करण्यात आले.
तसेच संध्याकाळी रामरोटी आश्रम ते संत गजानन महाराज मंदिर पर्यंत पालखी मिरवणूक काढण्यात आली. यावेळी ज्येष्ठ नागरिक संघाचे उपाध्यक्ष व कार्यक्रमाचे संयोजक आर.व्ही.राजपूत, ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष आर.टी.जोगी, संगिता बोरे, सुशिला निळे, राजकन्या जोगी, मिनाबाई पाचपांडे यांच्यासह भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
रामरोटी आश्रमाचे अध्यक्ष किशोर गावंडे, सचिव रामभाऊ टोंगे यांनी आश्रमामार्फत सर्व भाविकांना लाडू वाटप केले. संत गजानन महाराज यांची पुण्यतिथी भाद्रपद शुद्ध पंचमीला, म्हणजेच ऋषीपंचमीला साजरी केली जाते. संत गजानन महाराज यांनी ८ सप्टेंबर १९१० रोजी संजीवन समाधी घेतली. त्यामुळे या दिवशी भक्तगण ‘श्री गजानन विजय’ ग्रंथाचे पारायण केले जाते. शेगावात पालखी सोहळा आणि विविध कार्यक्रम साजरे केले जातात. तसेच महाराजांचे आवडते पदार्थ चून, भाकरी, अंबाडीची भाजी, कांदा, मिरच्या यांचा नैवेद्य भक्तीभावाने अर्पण करतात.
महाराष्ट्रातील बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव येथे ते प्रकट झाले आणि ते आधुनिक काळातील थोर संत मानले जातात. ते दत्तसंप्रदायाचे गुरू होते आणि त्यांना भगवान गणेशाचा अवतार मानले जाते. त्यांनी भक्तीमार्गाने लोकांपर्यंत देवाचे ज्ञान पोहोचवले.