प्रभु श्रीराम यांच्या प्राण प्रतिष्ठानिमित्त सावद्यात मिरवणूक

0
6

साईमत, सावदा, ता.रावेर : वार्ताहर

प्रभु श्रीराम यांच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त सावदा येथे सोमवारी, २२ जानेवारी रोजी काढण्यात आलेल्या शोभायात्रेला अभूतपूर्व प्रतिसाद लाभला. शोभायात्रेत श्रीराम नामाचा गजर करत हजारोंच्या संख्येने भाविकांनी आवर्जून सहभाग नोंदविला. ही मिरवणूक गांधी चौक, गवत बाजार, वंजारवाडी, मोठा आड, लहान मारुती, पाटील पुरा, संभाजी चौक, चांदणी चौक मार्गे निघाली होती. मिरवणुकीचा मार्ग रंगबिरंगी रांगोळ्यांनी, भगवे ध्वज आणि पताकांनी सुशोभीकरण केल्यामुळे संपूर्ण शहरातील वातावरण भक्तीमय झाले होते. तसेच शहरातील भोईवाडा, अमर गणेश मंडळ, साडी बाग, बुधवार पेठ, इंगळे वाडा, चितोडे वाणी समाज गल्ली, स्वामीनारायण नगर यांच्यासह विविध भागात राम भक्तांनी प्रभु श्रीराम यांचे तैल चित्र लावून विधिवत पूजा अर्चना केली. याप्रसंगी ए.पी.आय. जालिंदर पळे, पी.एस.आय. विनोद खांडबहाले, अन्वर तडवी, पो.कॉ. उमेश पाटील, यशवंत टहाकळे, देवा पाटील, बबन तडवी, संजू चौधरी यांच्यासह गृहरक्षक दलाच्या जवानांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.

दुर्गा माता मंदिर परिसरात एक क्विंटल बुंदीचे (प्रसाद) वाटप

शहरातील जागृत दुर्गा देवी मंदिरासमोर फैजपूर येथील कलाशिक्षक राजू साळी यांनी भव्य ८० किलो रांगोळीच्या माध्यमातून (संस्कार भारती) रांगोळी रेखाटत असताना त्यांना सरासरी ५ तासांचा अवधी लागला. ही रांगोळी सावदा व परिसरातील सर्व नागरिकांसाठी आकर्षणाचे केंद्रबिंदू (सेल्फी पॉईंट) ठरत आहे. चौकात प्राणप्रतिष्ठा निमित्त हरी मामा परदेशी, नितीन धोबी, पंकज नेमाडे यांच्यासह मित्र परिवार दात्यांनी प्रसाद म्हणून एक क्विंटल बुंदीचे वाटप केले.

कार सेवक म्हणून शहरात धडकले आ.खडसेचे फलक

प्रभु श्रीराम यांचे तैलचित्र आणि राम मंदिराची प्रतिकृती सह प्राणप्रतिष्ठानिमित्त हार्दिक शुभेच्छा…! ‘अभिमान आहे कार सेवा केल्याचा…’ असे उल्लेख असलेले फलक सावदा येथे विविध ठिकाणी लावण्यात आले होते. त्यावर कार सेवक आ.एकनाथराव खडसे यांच्यासह ॲड.रवींद्र भैय्या पाटील, ॲड.रोहिणी खडसे यांचे छायाचित्र होते. प्राणप्रतिष्ठा सोहळ्यावरून रा.काँ.चे खा.शरद पवार यांनी अनेक प्रश्‍न उपस्थित केल्यावरही अशा फलकाद्वारे मान्यवरांनी प्राणप्रतिष्ठा सोहळ्यात सहभाग नोंदविला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here