साईमत, जामनेर : प्रतिनिधी
येथील ज्ञानगंगा माध्यमिक आणि उच्च माध्यमिक विद्यालयात ५१ वे जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनाचा समारोप आणि बक्षीस वितरणाचा कार्यक्रम नुकताच घेण्यात आला. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून जामनेर नगर परिषदेच्या माजी नगराध्यक्षा साधना महाजन, डॉ.किरण कुवर (शिक्षणाधिकारी, माध्यमिक जळगाव), विद्यालयाचे प्राचार्य राजेंद्र सोनवणे, दीपक पाटील (सिनेट सदस्य), एजाज शेख (उपशिक्षणाधिकारी, माध्यमिक जळगाव), रागिनी चव्हाण (उपशिक्षणाधिकारी, माध्यमिक जळगाव), विष्णू काळे (अधीक्षक, शालेय पोषण आहार जामनेर), किशोर राजे (अध्यक्ष, जिल्हा विज्ञान मंडळ जळगाव), सुनील वानखेडे (सचिव, जिल्हा विज्ञान मंडळ) आदी उपस्थित होते.
प्रदर्शनात विद्यार्थी गटातून प्राथमिक गट सहावी ते आठवीमधून ३३ विज्ञान साहित्य, माध्यमिक गटात नववी ते बारावीमधून ३७ साहित्य तर आदिवासी गटातून १ साहित्य तसेच शिक्षक गटातून प्राथमिक गट ११, माध्यमिक गट १५, प्रयोग शाळा/परिचर गटातून दोन असा ९९ उपकरणांचा प्रदर्शनात सहभाग होता. त्यातून सहावी ते आठवी विद्यार्थी उच्च प्राथमिक गटातून भडगाव तालुक्यातील तांदलवाडीच्या या.द.पाटील विद्यालयातील आठवीचा विद्यार्थी दुर्गेश भागवत पाटील हा प्रथम आला. दिव्यांग गटातून उच्च प्राथमिक सहावी ते आठवीमधून एरंडोल तालुक्यातील कासोदा येथील साधना माध्यमिक विद्यालयातील सहावीची विद्यार्थिनी वैदिका राजेंद्र मोरे प्रथम आली. माध्यमिक गट नववी ते बारावी गटातून शेंदुर्णीतील श्रीकृष्ण माध्यमिक विद्यालयातील दहावीचा विद्यार्थी प्रीयश विलास सरोदे हा प्रथम आला. आदिवासी गटातून सहावी ते आठवी गटातून हातेडमधील अनुदानित आश्रमशाळेतील आठवीचा विद्यार्थी पवन सुभाष पावरा हा प्रथम आला. नववी ते बारावी गटातून रा.य.चव्हाण पोस्ट बेसिक आश्रमशाळा हातेडची नववीची विद्यार्थिनी अंजली किर्तन पावरा प्रथम आली. प्राथमिक शिक्षक शैक्षणिक साहित्य गटातून अनिता बाबुलाल बिऱ्हाडे जि.प. केंद्र शाळा, वावडे ह्या प्रथम आल्या. माध्यमिक शिक्षक गटातून नितीन अशोक शिरसाड स.न.झवर विद्यालय, पाळधी हे प्रथम आले. प्रयोगशाळा सहाय्यक गटातून सुनील गंगाराम पाटील नूतन माध्यमिक विद्यालय, चिंचाळे प्रथम आले.
यावेळी प्रथम, द्वितीय, तृतीय तसेच उत्तेजनार्थ सर्व विज्ञान प्रदर्शनात क्रमांक मिळविलेल्या विद्यार्थी, शिक्षक या दोन्ही गटातील विज्ञानप्रेमींना प्रमाणपत्रासह स्मृतीचिन्ह, पुष्पगुच्छ देऊन मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. विद्यालय आणि संस्थेच्यावतीने दोन दिवसीय विज्ञान प्रदर्शन कार्यक्रमाचे उत्कृष्ट नियोजन आणि सर्व सुविधा उपलब्ध करून दिल्याबद्दल ज्ञानगंगा विद्यालयाचे प्राचार्य राजेंद्र सोनवणे यांचा शिक्षणाधिकारी डॉ.किरण कुवर यांनी शाल, स्मृतीचिन्ह, प्रमाणपत्र देऊन गौरव केला. यशस्वीतेसाठी विद्यालयाचे सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.