राज्यस्तरीय कलाविष्कार प्रथम क्रमांकाच्या पुरस्काराने प्रियंका देवरे सन्मानित

0
15

साईमत, चाळीसगाव : प्रतिनिधी

अहमदनगर येथील स्पर्श सेवाभावी संस्थेतर्फे राज्यस्तरीय कलाविष्कार २०२४ प्रथम क्रमांकाच्या पुरस्काराने येथील प्रियंका विजय देवरे हिला नुकतेच सन्मानित करण्यात आले. तिला कथ्थक नृत्यकला व सांस्कृतिक क्षेत्रातील योगदानाबद्दल सन्मानपत्र, शाल, मानाचा फेटा, मेडल, स्मृतीचिन्ह देऊन सन्मानित केले. तिला हा पुरस्कार पद्मश्री स्व.सिंधुताई सपकाळ यांच्या सुकन्या ममता सपकाळ, सिंधुतार्इंचे मानसपुत्र विजय सपकाळ, विधानसभा सदस्य प्राजक्त तानपुरे, शुभांगी पाटील, अध्यक्ष टीचर्स असोसिएशन आदी मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. तिला मिळालेल्या पुरस्कारामुळे तिने चाळीसगावच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे. प्रियंकाने विविध कला सांस्कृतिक कार्यक्रमात परीक्षक म्हणूनही काम पाहिले आहे. तसेच तिला आतापर्यंत राज्यस्तरीय कलार्पण, उमंग, कलानंद कथ्थक नृत्य संस्था बाबाज थिएटर नाशिक, कथ्थक नृत्य स्पर्धा अशा अनेक ठिकाणी सन्मानित केले आहे.

प्रियंकाचे गुरु संजय भिमराव पवार आहे. तिने अखिल भारतीय गंधर्व महाविद्यालय मंडळ, मुंबई व प्राचीन कला केंद्र, चंदीगढ विद्यापीठाकडून कथ्थक विषय घेऊन प्रथम क्रमांकाने संगीत विशारद पदवी पूर्ण केली आहे. तसेच निरंतर शिक्षण अभ्यासक्रम अंतर्गत रंगगंध कलासक्त व्यास, चाळीसगाव यांच्यातर्फे नाट्यशास्त्राचा अभ्यास पूर्ण केलेला आहे. तसेच भारत गायन समाज, पुणे विद्यापीठातर्फे क्रियात्मक परीक्षेसाठी परीक्षक म्हणून कार्य करते. ती विविध सांस्कृतिक कार्यक्रमांना परीक्षक म्हणून उपस्थिती देते.

हा पुरस्कार माझा नसून माझ्या कलेचा आहे. मी सांस्कृतिक कार्यात सदैव कार्य करीत राहील, असे तिने सांगितले. प्रियंकाच्या यशाचे श्रेय तिने आई गं.भा. रंजना विजय देवरे यांना दिले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here