मुख्याध्यापकांनी शाळेची गुणवत्ता वाढवून सुंदर शाळा निर्माण करून नावलौकिक वाढवावा – ना. गुलाबराव पाटील

0
57

साईमत जळगाव प्रतिनिधी

जिल्ह्यातील शाळांना सुंदर व आदर्श करण्यासाठी भौतिक सुविधा पुरवण्यासाठी प्रयत्नशील असून त्यासाठी निधीची कमतरता भासू देणार नाही. सदर अभियान शाळांसाठी आधार असून शाळांना नवसंजीवनी मिळणार आहे. मुख्याध्यापक हे विद्यार्थ्यांसह समाज घडवण्याचे कार्य करत असतात. बदलत्या काळानुसार मुख्याध्यापकांनी अद्यावत राहून डिजिटल झाले पाहिजे. प्रथम येणाऱ्या शाळेला ३ लाखाचे बक्षिस देणार असल्याची घोषणा करून मुख्याध्यापकांनी शाळेची गुणवत्ता वाढवून सुंदर शाळा निर्माण करून राज्यात जिल्ह्याचा नावलौकिक वाढवावा असे प्रतिपादन पाणीपुरवठा स्वच्छता मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी केले. ते सेंट टेरेसा इंग्लिश मिडियम स्कूल येथे पंचायत समिती, जळगाव आयोजित “मुख्यमंत्री, माझी शाळ-सुंदर शाळा” अभियानाच्या सहविचार सभेच्या उद्घाटन प्रसंगी बोलत होते.

“मुख्यमंत्री, माझी शाळा – सुंदर शाळा” उपक्रमाचे उद्घाटन दिप प्रज्वलनाने पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी डायटचे डॉ. अनिल झोपे यांची प्राचार्य पदी नियुक्ती झाल्याबद्दल पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला.

यावेळी मार्गदर्शन करतांना डायट कॉलेजचे प्राचार्य डॉ. अनिल झोपे म्हणाले की, प्रत्येक घटकाने व मुख्याध्यापकांनी दिलेली जबाबदारी नियोजनाप्रमाणे पूर्ण करून लोकसहभाग वाढवावा. शिक्षकांनी दर्जेदार शाळांची निर्मितीचे आव्हान स्विकारून जळगाव जिल्हा राज्यात अव्वल येण्यासाठी प्रयत्नशील राहावे. तर प्राथमिक शिक्षणाधिकारी विकास पाटील यांनी सांगितले की, या अभियानामुळे शाळेला समाजाचा आधार मिळेल आणि समाजाला शाळेचा आदर्श मिळेल ही भावना निर्माण होण्यास मदत होईल. प्रत्येकाने या अभियाना मध्ये झोकून दिल्यास आणि प्रत्येक घटकांनी आपापली जबाबदारी पार पाडल्यास निश्चितच एक चांगले चित्र जिल्ह्यात उभे राहील आणि सर्व शाळा अतिशय दर्जेदार होतील.
सहविचार सभेच्या कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात गटशिक्षणाधिकारी शेख खलील यांनी “मुख्यमंत्री, माझी शाळा – सुंदर शाळा” उपक्रमाचे उद्देश व सविस्तरपणें माहिती विशद केली. सूत्रसंचालन उपशिक्षिका अनिता चौधरी यांनी केले तर आभार विस्तार अधिकारी विजय पवार यांनी मानले.
डायटचे प्राचार्य डॉ. अनिल झोपे, प्राथमिक शिक्षणाधिकारी विकास पाटील, गटविकास अधिकारी अतुल पाटील, गटशिक्षणाधिकारी शेख खलील, व्याख्याते डॉ. जे. बी. दरंदरे, शिक्षण विस्तार अधिकारी विजय पवार, सरला पाटील, जितेंद्र चिंचोले, शिक्षक सेनेचे नरेंद्र सपकाळे, सेंट टेरेसा शाळेच्या प्राचार्य सिस्टर ज्युलिट, व्यवस्थापक सिस्टर दिव्या यांच्यासह तालुक्यातील सर्व केंद्रप्रमुख , खाजगी व जिल्हा परिषद शाळांचे सर्व मुख्याध्यापक – मुख्याध्यापिका मोठ्या संख्येने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here