डॉ. सुरेश सावंत, डॉ.अनंता सूर, डॉ .प्रकाश सपकाळे, डॉ. नरेंद्र खैरनार आहेत यंदाचे पुरस्कारांचे मानकरी
साईमत/जळगाव/प्रतिनिधी :
येथील मराठीतील ख्यातनाम संशोधक, अभ्यासक, ज्येष्ठ साहित्यक-समीक्षक प्राचार्य डॉ. किसनराव पाटील यांच्या स्मृतीप्रित्यर्थ दरवर्षी राज्यस्तरीय आणि खान्देशस्तरीय वाङ्मय पुरस्कार देण्यात येतात. अशा वाडःमय पुरस्कारांची घोषणा नुकतीच केली आहे. हा पुरस्कार वितरण सोहळा येत्या शनिवारी, ७,जून २०२५ रोजी सकाळी १० वाजता महाराष्ट्र साहित्य परिषद, पुणे येथील माधवराव पटवर्धन सभागृहात आयोजित केला आहे. अध्यक्षस्थानी कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ.आर.एस.माळी असतील. पुरस्कारांचे वितरण अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष तथा साहित्यिक भारत सासणे यांच्या हस्ते होणार आहे. सोहळ्याला विनोद शिरसाठ (संपादन, साधना), वि.दा.पिंगळे (कार्यवाह, मसाप) यांची प्रमुख उपस्थिती राहील.
यंदाच्या पुरस्कारांसाठी २०२४ मध्ये प्रकाशित झालेल्या समीक्षा वाड़्:मय प्रकारांचा पुरस्कारांसाठी विचार केला होता. दरवर्षी यथोचित समारंभात मान्यवरांच्या हस्ते पुरस्कारांचे वितरण करण्यात येते. राज्यस्तरीय पुरस्काराचे स्वरूप ११ हजार रूपये रोख, स्मृतीचिन्ह व शाल, श्रीफळ असे आहे. त्यासाठी नांदेड येथील बालसाहित्यिक तथा लेखक, समीक्षक, व्यासंगी अभ्यासक डॉ. सुरेश सावंत यांच्या ‘बालसाहित्यातील नवे काही’ समीक्षा ग्रंथाची तर डॉ. अनंता सूर (यवतमाळ) यांच्या ‘साहित्य समाज आणि विचारधारा’ समीक्षा ग्रंथाची विभागून निवड केली आहे. हा पुरस्कार दोन्ही साहित्यिकांना विभागून दिला जाणार आहे. तसेच खान्देशस्तरीय पुरस्कार जळगाव येथील साक्षेपी समीक्षक तथा बहिणाबाईच्या काव्याचे चिकित्सक अभ्यासक डॉ. प्रकाश सपकाळे यांच्या ‘समीक्षा विवेक’ ग्रंथासाठी’ आणि साक्री येथील अभ्यासक डॉ.नरेंद्र बापूजी खैरनार यांच्या ‘मंचीय कवितेचा स्वरूपशोध’ या ग्रंथांना विभागून जाहीर झाला आहे. पाच हजार रूपये रोख, स्मृतीचिन्ह, शाल, श्रीफळ असे खान्देशस्तरीय पुरस्काराचे स्वरूप असणार आहे. वरील दोघा सारस्वतांना तो विभागून देण्यात येईल.
आयोजकांतर्फे उपस्थितीचे आवाहन
महाराष्ट्र साहित्य परिषद, पुणे शाखा पाचोरा- जामनेर यांच्यावतीने आयोजित पुरस्कार वितरण सोहळ्याला उपस्थितीचे आवाहन महाराष्ट्र साहित्य परिषद, पाचोरा शाखेचे कार्याध्यक्ष प्रा.डॉ.वासुदेव वले, प्राचार्य डॉ.किसनराव पाटील ज्ञानपरंपरेच्यावतीने डॅा. अशोक कोळी यांनी केले आहे.
