ग्रामविकास मंत्री गिरीष महाजन यांची पत्रकार परिषदेत माहिती
साईमत/जळगाव/प्रतिनिधी :
पंतप्रधान नरेंद्र मोदी रविवारी, २५ ऑगस्ट रोजी जळगाव दौऱ्यावर येत आहेत. सध्याची पावसाची स्थिती असल्यावरही दौऱ्याच्या सर्व तयारी प्रशासनाकडून पूर्णत्वास आल्या आहेत. ‘लखपती दीदी’ सोहळ्यानिमित्त होणारा कार्यक्रम ऐतिहासिक होणार असल्याची माहिती राज्याचे ग्रामविकास मंत्री गिरीष महाजन यांनी शुक्रवारी, २३ ऑगस्ट रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत दिली. पत्रकार परिषदेला राज्याचे प्रधान सचिव एकनाथ डवले, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, जि.प.चे सीईओ अंकीत, जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ.महेश्वर रेड्डी उपस्थित होते.
ना.गिरीष महाजन पुढे म्हणाले की, ज्या कष्टाळू महिलांनी स्वबळावर वर्षाकाठी एक लाखाहून अधिक रुपये कमवले आहेत. त्यांनी त्यांच्या कुटुबांला हातभार लावत कुटुंबियाना हलाखीच्या परिस्थितीतून बाहेर काढण्यात मदत करुन, समाजात एक आदर्श निर्माण केला आहे, अशा लखपती दिदींचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते जाहीररित्या सन्मान केला जाणार आहे.
सभेपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी राज्यातील सुमारे सव्वाशे भगिनींशी अर्धा तास संवाद साधणार आहेत. राज्यातील बचत गटाच्या माध्यमातून महिलांच्या सक्षमीकरणासाठी सुमारे १६ हजार कोटीचे कर्ज दिले गेले असल्याची माहिती ना.महाजन यांनी दिली. महिला सक्षमीकरणासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अनेक उपक्रम राबविले आहेत. राज्यातही महिलांना एसटी बसमध्ये अर्धे तिकीट करुन राज्य शासनाने एक पाऊल पुढे टाकले होते. त्या माध्यमातून राज्य शासनाची एसटी नफ्यात आले असल्याचे त्यांनी सांगितले.
जिल्ह्यासाठी ‘लखपती दीदी’ सोहळा अभिमानास्पद बाब
‘लखपती दीदी’ सोहळ्याचा मान आपल्या राज्याला मिळाला आहे. त्यात राज्यातून हा पहिला मान जळगाव जिल्ह्याला मिळाला असून ही अभिमानास्पद बाब आहे. राज्यात ६८ लाख महिला बचत गटाशी जोडल्या गेल्या आहेत. ही संख्या एक कोटीपर्यंत नेण्याचा संकल्प असल्याचेही ना.महाजन यांनी सांगितले.
महिलांसाठी चारशे शौचालयांचीही सोय
राज्य शासन ‘सरस’च्या माध्यमातून महिला बचत गटांना प्रोत्साहन देत आहेत. यातूनच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची ‘लखपती दीदी’ ही संकल्पना साकारली जात असल्याचे ना.गिरीष महाजन यांनी सांगितले. सोहळ्यासाठी सुमारे एक ते सव्वा लाख भगिनींची उपस्थिती लाभणार असल्याचा अंदाज व्यक्त करत सोहळ्याला दोन हजार ३०० वाहनांची व्यवस्था केली आहे. सोहळ्यास्थळी महिलांसाठी चारशे शौचालयांचीही सोय केली असल्याचेही ना.महाजन यांनी सांगितले.