नवी दिल्ली : वृत्तसंस्था
देशातील अनेक श्रीमंत कुटुंब परदेशात लग्न करत असल्याच्या ट्रेंडमुळे आपण फार व्यथित असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले आहेत. यावेळी त्यांनी देशवासियांना भारतातच लग्न करा, जेणेकरुन आपला पैसा परदेशात जाणार नाही असे आवाहनही केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘मन की बात’मधून देशवासियांशी संवाद साधताना लग्नाची खरेदी करताना ‘मेड इन इंडिया’ वस्तूंनाच प्राधान्य द्या असे आवाहन केले आहे.
“आता लग्नाचा हंगाम सुरु झाला आहे. लग्नाच्या हंगामात तब्बल ५ लाख कोटींची उलाढाल होईल असा अंदाज अनेक तज्ज्ञ दर्शवत आहेत. लग्नासाठी खरेदी करताना तुम्ही सर्वांनी फक्त भारतात तयार केलेल्या वस्तूंनाच प्राधान्य द्यायला हवं,“ असे आवाहन नरेंद्र मोदींनी केले आहे.
“आता लग्नाचा विषय आलाच आहे, तर एका गोष्टीने मला मागील अनेक काळापासून व्यथित केले आहे. आता जर मी हे दु:ख माझ्या कुटुंबातील सदस्यांसमोर व्यक्त करणार नाही तर मग कोणाकडे करणार? काही श्रीमंत कुटुंबांनी परदेशात जाऊन लग्न करण्याचा ट्रेंड सुरु केला आहे. याची खरंच गरज आहे का?,“ अशी विचारणा नरेंद्र मोदींनी केली आहे. यावेळी त्यांनी जर लग्नाचे सर्व कार्यक्रमात आपल्या मायभूमीत झाले तर आपला पैसा देशातच राहील असे म्हटले.