साईमत, प्रतिनिधी, जळगाव
जपानमधील वाकायामा येथे आशियाई आणि ओशनियन हायस्कूल विद्यार्थी मंचच्या वतीने आयोजित केलेल्या ‘शाश्वत विकास आणि पर्यावरण संरक्षण परिषद’मध्ये भारतातर्फे एकमेव शाळा, अनुभूती रेसिडेन्शिअल स्कूलचा विद्यार्थी, अतिशय जैन याने आपल्या देशाचे प्रतिनिधित्व करीत ‘भारतातील जल समस्या आणि त्यावरील उपाययोजना’ या विषयावर संशोधन सादर केले.
या परिषदेत विविध 22 देशांतील शाळांचे प्रतिनिधी सहभागी झाले होते. यांत विद्यार्थी प्रतिनिधींद्वारे जागतिक पातळीवर होणारे बदल आणि त्याचा त्यांच्या देशातील वातावरण, भौगोलिक, पर्यावरण, शिक्षण आदी घटकांवर होणारे परिणाम आणि त्यावर करता येऊ शकणाऱ्या उपाययोजनांवर संशोधन सादर केली जातात.
या परिषदेमध्ये अनुभूती स्कूलचा विद्यार्थी अतिशय जैन, शिक्षक स्वागत रथ यांना प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. भारताचे महावाणिज्यदूत निखिलेश गिरी, जपान वाकायामाचे गर्व्हनर किशीतमोटो शुहेई यांनी हा गौरव केला. या आंतरराष्ट्रीय पातळीवर होणाऱ्या परिषदेत 2014 पासून दरवर्षी अनुभूती रेसिडेन्शिअल स्कुल भारताचे प्रतिनिधित्व करीत असून आतापर्यंत अनुभूती रेसिडेन्शिअल स्कुलच्या विद्यार्थ्यांनी शैक्षणिक, अन्न-सुरक्षा, त्सुनामी अशा विविध पर्यावरण आणि मानवी विकास समस्यांवरील विषयांचे सादरीकरण केले आहे.
