साईमत/ न्यूज नेटवर्क । भुसावळ ।
येथील डीआरएम कार्यालयात रेल्वेच्या विविध प्रश्नांवर चर्चा करण्यासाठी भुसावळचे डीआरएम ईति पांडे यांच्यासोबत बैठक घेण्यात आली. चाळीसगाव, पाचोरा भागातून अपडाऊन करणाऱ्या प्रवाशांची मोठ्या प्रमाणावर संख्या आहे. मात्र, महाराष्ट्र एक्स्प्रेस आणि मेमू गाडीची वेळ गैरसोयीची असल्याने त्यात बदल करण्याची मागणी बैठकीत करण्यात आली. तसेच भुसावळ विभाग आणि जिल्ह्यातील रेल्वेच्या विविध प्रश्नांवर निर्णय घेण्यासाठी येत्या महिन्याभरात दिल्लीला रेल्वे मंत्र्यांकडे बैठक घेण्यात येणार असल्याची माहिती मंत्री गिरीष महाजन यांनी दिली. आगामी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आता ‘संकटमोचक’ विधानसभेच्या तयारीला लागले असल्याचे यावरुन स्पष्ट होत आहे.
भुसावळ रेल्वे स्थानकाचे पुर्ननिर्माण होत आहे. त्या अंतर्गत रेल्वे स्थानकाचा विकास केला जाणार आहे. त्या अनुषंगाने लोकप्रतिनिधी व डीआरएम यांच्यासोबतच्या बैठकीत बसस्थानकाची जागा रेल्वेला व बसस्थानकासमोरील रेल्वेची जागा बसस्थानकाला देण्याबाबत सकारात्मक चर्चा करण्यात आली. दोन्ही बाजूंनी सकारात्मक प्रतिसाद मिळाल्यानंतर यासंदर्भातील प्रस्ताव राज्य शासन आणि रेल्वे बोर्डाकडे पाठविण्यात येणार आहे. महिन्याभरानंतर त्यास मंजुरी मिळण्याची अपेक्षा आहे. दरम्यान, महाराष्ट्रासह मेमू गाडीच्या वेळेत बदल करावा, भुसावळातील अंडरपासची कामे पूर्ण करावीत, बोदवड येथील आरयुबीचा प्रश्न सोडवावा, अजंता एक्स्प्रेसचा भुसावळपर्यंत विस्तार करावा, यासह भुसावळ विभागातील व जळगावातील प्रश्नांबाबत सखोल चर्चा करण्यात आली.
भुसावळात कंटेनर डेपो सुरू व्हावा
भुसावळ शहरात कंटेनर डेपो सुरू करण्याची मागणी आ.संजय सावकारे यांनी केली. कंटेनर डेपो सुरू झाल्यास बेरोजगारांच्या हाताला काम मिळेल, असेही ते म्हणाले. बोदवड येथील आरयुबी बोगद्याचा प्रश्न तसेच सावदा रेल्वे स्थानकावरील मालधक्क्यावर शेडची गरज आहे. पावसाळ्याचे दिवस असल्याने येथे तात्काळ शेडची निर्मिती करावी. जेणे करून गैरसोय होणार नाही, अशी मागणी आ.चंद्रकांत पाटील यांनी केली.
मेमूसह महाराष्ट्र एक्स्प्रेसच्या वेळेत बदल करा : आ.मंगेश चव्हाण
चाळीसगाव येथील आ.मंगेश चव्हाण यांनी महाराष्ट्र एक्स्प्रेस व देवळाली भुसावळ मेमू गाडीच्या वेळेत बदल करण्याची मागणी केली. या गाडीची वेळ गैरसोयीची असल्याने अप-डाऊन करणाऱ्या चाकरमान्यांची गैरसोय होत असल्याचे त्यांनी निदर्शनास आणून दिले. प्रवाशांना सुविधा मिळण्यासाठी प्राधान्य द्यावे, असेही ते म्हणाले. आ.सुरेश भोळे (राजूमामा) यांनीही जळगाव येथील रेल्वे स्थानकाच्या अद्यावतीकरणाचा मुद्दा उपस्थित करत शेडची मागणी केली. पावसाळा, उन्हाळ्यात प्रवाशांची होणारी गैरसोय थांबविता येईल, असेही ते म्हणाले. यावेळी खा.स्मिता वाघ यांनीही प्रवाशांना सुविधा देण्यासाठी रेल्वे प्रशासनाने नियोजन करावे, असे त्या म्हणाल्या. पाचोरा-जामनेर या नवीन ब्रॉड गेज लाईनीसाठी नव्याने भूमी अधिग्रहण केले जाणार आहे. या कामाचे टेंडर निघाल्याचे डीआरएम म्हणाल्या.
यांची होती बैठकीला उपस्थिती
बैठकीला मंत्री गिरीश महाजन, खा.स्मिता वाघ, आ.संजय सावकारे, आ.सुरेश भोळे, आ.चंद्रकांत पाटील, आ.मंगेश चव्हाण, एडीआरएम सुनील कुमार, वरिष्ठ वाणिज्य प्रबंधक अजयकुमार, वरिष्ठ मंडळ अभियंता तरुण दंडोतिया यांच्यासह अन्य अधिकारी उपस्थित होते.