साईमत, जळगाव : प्रतिनिधी
विद्यावर्धिनी शिक्षण संस्थेच्या अध्यक्षा मंगला दुनाखे यांच्या वाढदिवसानिमित्त दरवर्षी शालेय नाटक स्पर्धाचे आयोजन करण्यात येते. त्यात बालवाडीपासून ते १० वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांचा समावेश करण्यात येतो. दरवर्षीप्रमाणे यावर्षीही नाटक स्पर्धेचे आयोजन शाळेत केले होते. त्यात विद्यार्थ्यांनी समाजोपयोगी व विद्यार्थ्यांना प्रेरित करणाऱ्या नाटकांनी प्रेक्षकांची मने जिंकली. प्लास्टिक कचरा मुक्ती, मोबाईलचे दुष्परिणाम, मी आहे डॉ.आनंदीबाई जोशी, आहाराचे महत्व अशा विविध विषयावर विद्यार्थ्यांनी प्रकाश टाकण्याचा प्रयत्न केला. त्यात विद्यार्थ्यांनी आपल्या अभिनयाचे कसब वापरले. नाटकाचे परीक्षण विशाल जाधव, योगेश लांबोळे यांनी केले.
विद्यावर्धिनी शिक्षण संस्थेचे चेअरमन प्रेमचंद ओसवाल यांनी विद्यार्थ्यात नाटकातून कला जोपासणे हा महत्वाचा गुण येत असतो. अध्यक्षा मंगला दुनाखे यांनी नाटकातील पात्रांना कौतुकाची शब्दरूपी थाप दिली. सचिव सचिन दुनाखे यांनी विद्यार्थ्यांना भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी मुख्याध्यापक संगीता गोहील, मनीषा पाटील, ज्योती कुलकर्णी शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. सूत्रसंचालन विजया पाटील तर आभार दीपाली पाटील यांनी मानले.