साईमत, चाळीसगाव : प्रतिनिधी
युवकांनी चारित्र्य संपन्न व्यक्तिमत्त्व घडविण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे. त्यासाठी संघर्षशील व्यक्तिमत्त्वांची जीवनचरित्रे अभ्यासावी. सोबतच आत्मसन्मानाने जीवन जगण्याचा प्रयत्न करावा. राष्ट्र घडविण्याचे सामर्थ्य केवळ युवकांमध्येच असल्याचे प्रतिपादन प्रमुख मार्गदर्शक मॅनेजमेंट गुरू प्रशांत पुप्पल यांनी केले. चाळीसगाव येथील बी.पी.आर्ट्स, एस.एम.ए सायन्स आणि के.के.सी कॉमर्स महाविद्यालयात स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र आणि रामकृष्ण मिशन आश्रम, छत्रपती संभाजीनगर, रामकृष्ण विवेकानंद सेवा संस्था, चाळीसगाव यांच्या संयुक्त विद्यमाने मार्गदर्शनपर व्याख्यान पार पडले. त्यावेळी ते बोलत होते. व्यासपीठावर चाळीसगाव एज्युकेशन सोसायटीचे उपाध्यक्ष मिलिंद देशमुख, उपप्राचार्य डॉ.अजय काटे, प्रा. धनंजय वसईकर, डॉ.श्रीमती के.एस.खापर्डे आदी उपस्थित होते.
याप्रसंगी प्रमुख पाहुणे स्वामी परामृतानंद यांनी स्वामी विवेकानंद यांच्या विचारांचे सामर्थ्य आदर्श युवक निर्माण करण्यासाठी उपयुक्त असल्याचे मत व्यक्त केले. स्वामींच्या विचारांना आत्मसात करण्याचे आवाहन त्यांनी उपस्थितांना केले. उपप्राचार्य धनंजय वसईकर यांनी युवकांना बलोपासनेचा मंत्र दिला. अध्यक्षीय भाषणात प्राचार्य डॉ.मिलिंद बिल्दीकर यांनी येणाऱ्या काळात विद्यार्थी हा समाजात बदल घडविण्यासाठी प्रयत्नशील असावा असे मत व्यक्त केले.
विद्यार्थ्यांना पुस्तकांची दिली भेट
याप्रसंगी रामकृष्ण विवेकानंद सेवा संस्थाचे पदाधिकारी हेमंत साळी, रमेश जानराव, अभय भालेराव, नीलेश आंबेकर उपस्थित होते. याप्रसंगी प्रश्नोत्तरांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना पुस्तके भेट देण्यात आली. यशस्वीतेसाठी प्रा.डॉ.पूनम निकम, प्रा.किशोर पाटील, प्रा.नीलेश पाटील, प्रा.नागराज रावते, विद्यार्थी गुणवंत सोनवणे, विजय मोरे, प्रणाली जाधव, अर्पित चव्हाण, मोनाली मासरे, प्रेरणा पाटील यांनी परिश्रम घेतले. प्रास्ताविकात स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र समन्वयक प्रा. नितीन नन्नवरे यांनी वर्षभरात राबविण्यात येणाऱ्या विविध प्रकारच्या उपक्रमाची माहिती देऊन व्याख्यानाचे महत्त्व सांगितले. सूत्रसंचालन प्रा.रवींद्र पाटील तर आभार डॉ. अरुण सावरकर यांनी मानले.