साईमत, चाळीसगाव : प्रतिनिधी
तालुक्यातील ब्राह्मणशेवगे ते माळशेवगे रस्त्याचे जिल्हा परिषद पंचवीस पंधरा निधी अंतर्गत डांबरीकरण करण्यात येत आहे. गेल्या एक महिन्यापासून हे काम अतिशय संथगतीने सुरु आहे. अनेक दिवसांपासून माळशेवगे-ब्राह्मणशेवगे रस्त्यावर मोठमोठे दगड टाकून ठेवल्यामुळे बस आणि इतर वाहतूक बंद आहेे. त्यामुळे माळशेवगे येथील प्रवाशांना ३ ते ४ कि.मी. पायपीट करावी लागत आहे. अशातच ओबडधोबड दगडांवरुन माळशेवगे येथील एक महिला पडून तिला दुखापत सहन करावी लागली. तसेच गाडी पडल्यामुळे रम्हणे येथील एका दुचाकी स्वाराला डोक्याला मार लागुन जखम झाली आहे. रस्त्यावर टाकुन ठेवलेल्या खडीमुळे नागरिकांचे हाल होत आहेत. तसेच रस्त्याच्या डांबरीकरणाच्या कामासाठी विहिरीचा ठिसुळ, मुरमाड निकृष्ठ दर्जाच्या दगडांचा वापर करण्यात येत आहे. रस्त्याचे काम दर्जेदार न झाल्यास ग्रामस्थांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे.
रस्त्यावरील आधीची खडी स्क्रबिंग न करता जशीच्या तशी सोडून देत त्यावर नवीन निकृष्ट दर्जाच्या ठिसुळ दगडांची खडी पसरवून ठेवली आहे. खडी पसरलेल्या रस्त्यावरुन वाहन चालविले तर त्या खडीचे लागलीच बारीक मातीत रुपांतर होत आहे. खडीची आताच अशी परिस्थिती आहे तर भविष्यात रस्त्याची काय स्थिती असेल. रस्त्यावर खडी टाकली असतांना संबंधित विभागातील अधिकारी अनभिज्ञ असल्याचे समजते. काम सुरु झाल्यावरही अद्याप त्याठिकाणी फलक लावण्यात आलेला नाही.
चाळीसगाव तालुक्याचे आ.मंगेश चव्हाण तालुक्यासाठी अहोरात्र प्रयत्न करुन भरघोस निधी मिळवून आणत आहेत. परंतु निधीवर ठेकेदार आपली पोळी शेकत आहेत, असे चित्र निकृष्ट प्रकारच्या कामातून दिसत आहे. रस्त्याचे काम दर्जेदार व्हावे. तसेच संबंधित विभागाकडून वेळोवेळी रस्त्याच्या कामाचे परीक्षण व्हावे, अशी मागणी ब्राह्मणशेवगे, माळशेवगे येथील ग्रामस्थांनी केली आहे.
रस्त्याचे काम दर्जेदार न झाल्यास संजय बाविस्कर, सचिन पवार, किरण निकम, पिना दाभाडे, तानाजी जाधव, सुनील पवार, आबा पवार, पन्नालाल चव्हाण, दादा सैय्यद, शब्बीर सैय्यद, रऊफ सय्यद, संजय पवार, भाईदास चव्हाण, मल्लू महारू, योगेश सोनवणे, नाना राठोड (सर्व ब्राम्हणशेवगे), बाळासाहेब पाटील (माळशेवगे) यांच्यासह ब्राह्मणशेवगे आणि माळशेवगे येथील ग्रामस्थांनी आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.