
फिल्मी स्टाईलने पळालेल्या दोन कुख्यात चोरट्यांना अटक करण्यात आले
साईमत/अमळनेर/प्रतिनिधी :
अमळनेर शहरासह परिसरातून २४ मोटारसायकल चोरीच्या गुन्ह्यात अटक करण्यात आलेल्या व पोलिसांच्या तावडीतून फिल्मी स्टाईलने पळालेल्या दोन कुख्यात चोरट्यांना अखेर तीन दिवसांच्या अथक शोधमोहिमेनंतर अटक करण्यात अमळनेर पोलिसांना यश मिळाले आहे.
हिम्मत रेहंज्या पावरा (३२) आणि अबीलाल उर्फ अंबादास बुरड्या खरडे (२७, रा. सातपिंप्री, ता. शहादा, जि. नंदुरबार) या दोघांना काही दिवसांपूर्वी मोटारसायकल चोरी प्रकरणी अटक करण्यात आली होती. पोलीस कोठडी संपल्यानंतर न्यायालयाने त्यांना २८ नोव्हेंबरपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली होती, परंतु जळगाव कारागृहात जागा नसल्याने त्यांना नंदुरबार कारागृहात हलविण्याचे आदेश देण्यात आले होते.
नंदुरबारकडे नेत असताना अंबादासने अचानक तब्येत बिघडल्याचे नाटक करून डोळे मिटले. पोलिसांनी हॉटेल नयनजवळ थांबवल्यानंतर त्याने संधीचा फायदा घेत बेडी काढून पळ काढला. त्याच क्षणी शेजारी बसलेला हिम्मत पावरा देखील बेडीसकट शेतात पळून अदृश्य झाला. पोलिसांनी पाठलाग केला, परंतु दोघेही पसार झाले.
घटनेनंतर पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम यांनी विशेष पथके तैनात केली. हेडकॉन्स्टेबल विनोद सोनवणे, सुनील तेली, भूषण परदेशी, अमोल करडईकर आणि मयूर पाटील यांच्या पथकांनी तीन दिवस सलग जंगलात शोधमोहीम राबवली. अंबादासचे नातेवाईक ताब्यात घेऊन चौकशी केल्यावर तो रंजाणे गावातील बहिणीकडे लपल्याचे समोर आले आणि पहाटेच सापळा रचून त्याला अटक करण्यात आली. दुसरा आरोपी हिम्मत पावरा शिंदखेडा तालुक्यातील विरदेल येथील एका हॉटेलवर असल्याची माहिती मिळताच पोलिसांनी धडक देऊन त्यालाही ताब्यात घेतले.


