जळगावचे पोलीस अधीक्षक डॉ.महेश्वर रेड्डी यांची पत्रकार परिषदेत माहिती
साईमत/जळगाव/प्रतिनिधी:
जिल्ह्यात वाढलेल्या मोबाईल चोरीच्या घटनांना आळा घालण्यासाठी एमआयडीसी पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. कारवाईत चोरीचे तब्बल ३३ मोबाईल हस्तगत केले आहेत. तरुण नोरसिंह गुजरिया (वय २३, रा. इंदूर, मध्य प्रदेश) अशा संशयित आरोपीला कासमवाडी परिसरातून अटक केली असल्याची माहिती पोलीस अधीक्षक डॉ.महेश्वर रेड्डी यांनी सोमवारी, २३ जून रोजी पत्रकार परिषदेत दिली.
एमआयडीसी पोलीस ठाण्यात याप्रकरणी मोबाईल चोरीचा गुन्हा दाखल केला होता. गुन्ह्याचा तपास करण्यासाठी पोलीस अधीक्षक डॉ.महेश्वर रेड्डी आणि अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय अधिकारी संदीप गावीत आणि एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक बबन आव्हाड यांनी गुन्हे शोध पथकाला सूचना दिल्या होत्या.
शेतातील जमीनीत पिशवीत पुरले होते मोबाईल
जळगावातील कासमवाडी परिसरात शनिवारी, २१ जून रोजी बाजार असल्याने पोलीस निरीक्षक बबन आव्हाड यांनी पीएसआय राहुल तायडे, चंद्रकांत धनके, पो.ना. प्रदीप चौधरी, पो.कॉ. रतन गिते यांना बाजारात पेट्रोलिंग करत असतांना त्यांना एक संशयित आरोपी तरुण आणि दोन अल्पवयीन मुले संशयितरित्या फिरताना आढळले. त्यांच्यावर संशय आल्याने त्यांना ताब्यात घेऊन त्यांची अंगझडती घेतल्यावर त्यांच्याकडे चार मोबाईल सापडले. त्यांच्याकडे मोबाईलबाबत विचारपूस केल्यावर त्यांनी सुरुवातीला उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यामुळे त्यांना पोलीस ठाण्यात आणून त्यांची सखोल चौकशी केली. तेव्हा त्यांनी स्वामी नारायण मंदिराच्याजवळ पाल टाकून राहत असलेल्या शेतात जमिनीत एका पिशवीत मोबाईल पुरून ठेवल्याची माहिती दिली.
४ लाखांच्या ३३ मोबाईलसह रावेरमधील ८ मोबाईलही केले हस्तगत
पोलिसांनी तात्काळ आरोपीला सोबत घेऊन घटनास्थळी धाव घेतली. आरोपीने शेतातील एका झाडाजवळ जमिनीतून पुरून ठेवलेल्या पिशवीतील ४ लाख ९ हजार किंमतीचे ३३ मोबाईल काढून दिले. सर्व मोबाईल शनिवार बाजार तसेच जिल्ह्यातील वेगवेगळ्या बाजारांमधून चोरी केल्याची संशयित आरोपी आरोपी तरुण नोरसिंह गुजरिया याने कबुली दिली. जप्त केलेल्या ३३ मोबाईलपैकी एक मोबाईल रावेर पोलीस ठाण्याच्या हद्दीतून गहाळ झाल्याचे निष्पन्न झाले. रावेर पोलीस ठाण्याचे अंमलदार महेश मोगरे हे त्या मोबाईलच्या शोधात एमआयडीसी येथे आले होते. तेव्हा त्यांना रावेर पोलीस ठाण्याच्या हद्दीतून गहाळ झालेले ८ मोबाईल त्यांच्या ताब्यात देण्यात आले. तपास पो.ना. हेमंत जाधव करत आहेत.