साईमत, चाळीसगाव : प्रतिनिधी
चंदनाची चोरी करून वाहतूक करणाऱ्या दोन संशयितांवर शहर पोलीस स्टेशनने कारवाई केली आहे. ताब्यात घेतलेल्या आरोपींची नावे शेख अमीन शेख हजिज (वय ५२) आणि अशोक लक्ष्मण आव्हाड (वय ४५, दोन्ही रा. हस्ता, ता. कन्नड, जि. औरंगाबाद) अशी आहेत. त्यांच्या ताब्यातून चंदनाचे लाकूड, एक मोटारसायकल, दोन मोबाईल, चंदन चोरीकामी लागणारे साहित्य असा ५८ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. दोघांविरोधात चाळीसगाव शहर पोलीस स्टेशन गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान, तस्करी करणाऱ्यांवर वचक बसण्याकामी उपाययोजना होणे गरजेचे आहे.
सविस्तर असे की, रात्री गस्तीचे अधिकारी स.पो. निरीक्षक दीपक बिरारी आणि गुन्हे शोध पथकातील कर्मचाऱ्यांची ६ रोजी सकाळी ९.३० वाजेदरम्यान पोलीस स्टेशनकडून नेमणूक केली होती. अधिकारी आणि कर्मचारी यांना योग्य त्या सूचना पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांनी गस्तकामी दिलेल्या होत्या. त्यांच्यासोबत चालक पो.हे.कॉ. नितीन वाल्हे, पो.कॉ.विजय पाटील, पवन पाटील, समाधान पाटील असे शहरात शासकीय वाहनावर गस्त करीत असताना त्यांना भडगाव रोड अंध शाळेजवळून दोन संशयित मोटारसायकलवर एका पिशवीत काहीतरी घेऊन जातांना दिसले. पोलिसांनी त्यांचा पाठलाग करुन त्यांना पळून जाण्याची संधी न देता शिवाजी चौकात पकडले.
आरोपींकडून झाडे तोडण्यासाठी वापरलेले साहित्य हस्तगत
आरोपींकडील सापडलेल्या पिशवीत अंदाजे १५ हजार रुपये किमतीचे ३ किलो वजनाचे चंदनासारखे दिसणारे लाकूड व झाडे तोडण्यासाठी वापरण्यात येणारी एक कुऱ्हाड आदी साहित्य मिळून आले. संशयितांनी कोठेतरी चंदनाचे झाड तोडून चोरी केल्याचे प्रथमदर्शनी दिसून आल्याने त्यांना त्याबाबत विचारपूस केल्यावर त्यांनी कोणतीही समाधानकारक उत्तरे दिली नाहीत. आरोपींकडून ५८ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करुन ताब्यात घेण्यात आले. आरोपींवर चाळीसगाव शहर पोलीस स्टेशन गुन्हा दाखल केला आहे. जप्त केलेले चंदनाचे लाकूड वनविभागाकडून परीक्षणासाठी ठेवण्यात आले आहे. तपास पो.ना. महेंद्र पाटील, पो.कॉ. विजय पाटील करीत आहेत.