शिवसेनेची तडाखेबाज टीका
साईमत/ जळगाव /प्रतिनिधी
मतमोजणी केंद्रावर सत्ताधारी पक्षाच्या दबावाखाली निवडणूक निर्णय अधिकारी आणि पोलीस प्रशासनाने जाहीरपणे पक्षपाती वर्तन केले, असा निषेध शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाचे जिल्हा संघटक गजानन मालपुरे यांनी पत्रकार परिषदेत केला. त्यांनी दोषी अधिकाऱ्यांची चौकशी करून त्यांना तातडीने बडतर्फ करण्याची मागणी केली.
पत्रकार परिषदेत माहिती अधिकार कार्यकर्ते दीपक कुमार गुप्ता देखील उपस्थित होते. मालपुरे यांनी सांगितले की, मतमोजणी दरम्यान प्रभाग क्रमांक १० चे उमेदवार कुलभूषण पाटील आणि प्रभाग क्रमांक ८ चे उमेदवार मयूर कापसे यांनी फेरमतमोजणीसाठी अर्ज केला होता, जो अवघ्या १५ ते ३० मिनिटांत पूर्ण होऊ शकला असता. मात्र, निवडणूक निर्णय अधिकारी विनय गोसावी यांनी हा अर्ज जाणीवपूर्वक फेटाळून टाकला आणि फक्त सत्ताधारी पक्षाच्या अर्जांना मान्यता दिल्याचा आरोप मालपुरे यांनी केला.
यावेळी शांततेत मागणी करणाऱ्या शिवसेनेच्या कार्यकर्त्यांवर पोलिसांनी अमानुष बळाचा वापर केला. उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन गणापुरे आणि पोलीस निरीक्षक बबन आव्हाड यांच्या सूचनेनुसार कार्यकर्त्यांना मारहाण केली गेली. मालपुरे म्हणाले, “निवडणूक निर्णय अधिकारी आणि पोलीस प्रशासनाने सुपारी घेतल्यासारखे काम केले आहे.”
मतमोजणी केंद्रात पत्रकारांनाही प्रवेश नाकारला गेला आणि अनेकांना ढकलून व धक्काबुक्की केली गेली. मालपुरे यांनी ही घटना लोकशाहीला धक्का देणारी असल्याचे सांगितले.
शिवसेनेच्या मुख्य मागण्या:
-
विनय गोसावी: फेरमतमोजणीचा हक्क नाकारल्याबद्दल आणि पक्षपाती वर्तन केल्याबद्दल तातडीने चौकशी करून बडतर्फ करावा.
-
नितीन गणापुरे व बबन आव्हाड: पत्रकारांवर धक्काबुक्की, कार्यकर्त्यांवर मारहाण व बळाचा वापर केल्याबद्दल सेवा मुक्त करावेत.
-
खोट्या फिर्यादीचा निषेध: ‘ईव्हीएम मशीन फोडण्याचा प्रयत्न केला’ असा खोटा गुन्हा त्वरित मागे घ्यावा.
मुख्य निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे याबाबत तक्रार दाखल झाली असून, दोषींवर कारवाई न झाल्यास शिवसेनेच्या वतीने तीव्र आंदोलनाची चेतावणी देण्यात आली आहे.
