प्रतिष्ठानतर्फे बालकवी, प्र. के. अत्रे यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन
साईमत/जळगाव/प्रतिनिधी :
शहरातील काव्य रत्नावली चौकात समाज चिंतामणी प्रतिष्ठानतर्फे बालकवी त्र्यंबक बापूजी ठोंबरे आणि प्र. के. अत्रे यांच्या जयंतीदिनी अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन केले होते. अध्यक्षस्थानी बालकवींच्या पणती विशाखा कुलकर्णी होत्या. यानिमित्त कविसंमेलन घेण्यात आले. त्यात कवींनी सहभाग घेऊन कविता सादर केल्या.
कविसंमेलनात स्वराचित कवितांबरोबरच बालकवी यांच्या ‘श्रावण मासी हर्ष मानसी’, ‘फुलराणी’, ‘आनंदी आनंद गडे’, ‘औदुंबर’, ‘कोठुनी येते मला कळेना’ तर प्र. के. अत्रे यांची ‘प्रेमाचा गुलकंद’ अशा सुरेख कविता कविसंमेलनात सादर केल्या. अध्यक्षीय मनोगत व्यक्त करतांना बालकवींच्या पणती विशाखा कुलकर्णी यांनी ‘आपणच खरे बालकवींचे नातेवाईक आहेत’ असे गौरवोद्गार काढले. सूत्रसंचालन कवी अशोक पारधे तर प्रतिष्ठानचे अध्यक्ष आर.डी. कोळी यांनी आभार मानले.
यांनी घेतला सहभाग
कविसंमेलनात विशाखा कुळकर्णी, निवृत्तीनाथ कोळी, भास्करराव चव्हाण, डी. बी. महाजन,प्रा. प्रकाश महाजन, प्रकाश पाटील, मंजुषा पाठक, आर. जे. सुरवाडे, ज्योती वाघ, पुष्पलता कोळी, प्रज्ञा नांदेडकर, वर्षा अहिरराव, अशोक पारधे, आर. डी. कोळी, शालिनी सैंदाणे, गोविंद पाटील आदींनी सहभाग नोंदविला.
