‘कथाशील’ कथासंग्रहाचाही यापूर्वी धारवाड विद्यापीठाच्या अभ्यासक्रमात समावेश
साईमत/जळगाव/प्रतिनिधी
तालुक्यातील असोदा येथील सार्वजनिक विद्यालयाचे मुख्याध्यापक तथा सत्यशोधकी साहित्य परिषदेचे जिल्हाध्यक्ष डॉ. मिलिंद विनायक बागुल यांच्या ‘संदर्भ माझ्या जातीचे’ कविता संग्रहातील ‘माय’ शीर्षकाची कवितेचा जळगावच्या कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या एफवायबीएच्या सत्र दुसऱ्यासाठी मराठी विषयाच्या अभ्यासक्रमात निर्धारित केलेल्या खान्देश काव्यप्रबोध संपादित पुस्तकात समावेश केला आहे. यापूर्वी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात एम. ए. मराठी भाग दोनच्या अभ्यासक्रमात त्यांचा ‘संदर्भ माझ्या जातीचे’ हा कवितासंग्रह समावेश होता. त्याच कविता संग्रहातील ‘समता’ ही कविता स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेडच्या बी.ए. प्रथम वर्षाच्या महाविद्यालयीन मराठी अभ्यासक्रमात समावेश केला आहे. त्यांचा ‘कथाशील’ हा कथासंग्रह कर्नाटकच्या धारवाड विद्यापीठात अभ्यासक्रमासाठी समावेश केला आहे.
शंकरराव खरात कथात्म वाङ्मय हे वैचारिक पुस्तक उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या संदर्भ ग्रंथ म्हणून निवडण्यात आलेले आहे. कोल्हापूरच्या स्वामी विवेकानंद महाविद्यालय (स्वायत्त) अभ्यासक्रमात त्यांच्या कवितेचा तसेच गडचिरोलीच्या गोंडवाना विद्यापीठात बीए भाग एक सत्र दुसऱ्यासाठी ‘बाप’ नावाच्या कथेचा समावेश केला आहे. फ. मुं. गजबजलेलं गाव, हमालपुरा ते कुलगुरू, तेवढेच संदर्भ आमचे (कवितासंग्रह), बाबुराव गायकवाड यांचे लघु निबंध समीक्षा (संपादित), झंझावात (संपादित), प्रतिभा शिवार (संपादन) ही त्यांची पुस्तकेही प्रकाशित झाली आहे. ‘संदर्भ माझ्या जातीचे’ कवितासंग्रहावर प्रा. डॉ. के. के. अहिरे यांनी संपादित केलेले ‘संदर्भ माझ्या जातीचे’ आंबेडकरी जाणिवांच्या कविता पुस्तक २०१६ ला प्रकाशित झाले आहे.