साईमत, पहुर, ता.जामनेर : वार्ताहर
जामनेरला तालुका साहित्य-सांस्कृतीक मंडळातर्फे चौदावे खान्देश स्तरीय मराठी साहित्य संमेलन नुकतेच पार पडले. त्यात पहुर येथील बालकवी, बाल साहित्यिक रूपाली कैलास माळी हिच्या ‘माय सावित्री’ कवितेला प्रथम क्रमांक तर ‘कहाणी एका संघर्षाची’ कथेसाठी द्वितीय क्रमांकाचे पारितोषिक पटकावले. याबद्दल तिला उपस्थित साहित्यिकांच्या हस्ते पारितोषिक देऊन गौरविण्यात आले. व्यासपीठावर नाशिकचे अभिनेते गझलकार अजय बिरारी, धरणगावचे ज्येष्ठ साहित्यिक तथा पत्रकार बी.एन.चौधरी, जामनेर तालुका साहित्य-सांस्कृतीक मंडळाचे संस्थापक-अध्यक्ष डी. डी.पाटील यांच्यासह जिल्ह्यातील ज्येष्ठ साहित्यिक उपस्थित होते.
रुपाली माळी हिने बालपणापासून कविता लिहिण्याचा छंद जोपासला आहे. तिने आतापर्यंत १२०० च्यावर स्वरचित कविता लिहिलेल्या आहे. तसेच रोज एक कविता लिहिण्याचा छंद जोपासत आहे. लवकरच कविता संग्रह प्रकाशित करण्याचा तिचा मानस आहे. यापूर्वीही तिला अनेक पुरस्कारांनी सन्मानित केलेे आहे. रुपाली ही पहुर येथील सावित्रीबाई फुले माध्यमिक विद्यालयाची माजी विद्यार्थिनी आहे.
बालकवी, बाल साहित्यिक घडावे, यासाठी साहित्य सांस्कृतिक मंडळाचे पहुर शाखेचे संचालक तथा सावित्रीबाई फुले माध्यमिक विद्यालयातील कवी तथा ज्येष्ठ उपशिक्षिका श्रीमती कल्पना बनकर, कवी शंकर भामेरे यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यालयातील आठवीतील गायत्री दीपक जवखेडे, गायत्री योगेश पवार, आश्विनी प्रवीण चौधरी, माहेश्वरी संजय धनगर, रुद्र शांतीलाल उबाळे ह्या विद्यार्थ्यांनी स्वरचित कविता सादर केल्याबद्दल उत्तेजनार्थ पारितोषिक मिळाले. यशस्वी सर्व बालकवींचे सर्वत्र कौतुक होत आहे.
