साईमत/ जिल्हा प्रतिनिधी/ जळगाव :
आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूर येथे जाणाऱ्या भाविकांच्या सोयीसाठी राज्य परिवहन महामंडळातर्फे जिल्ह्यातून १२५ हून अधिक बसेसचे नियोजन केले आहे. याशिवाय जिल्ह्यातील कोणत्याही गावातून ४० पेक्षा अधिक प्रवाशांनी मागणी केल्यास थेट त्यांच्या गावातून पंढरपूरसाठी बस उपलब्ध करून देण्यात येणार असल्याची माहिती एसटी परिवहन महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी दिली.
जिल्ह्यात विविध आगारातून दररोज किमान २५ बसफेऱ्या पंढरपूर येथे आषाढी एकादशीनिमित्त विविध गावांमधून भाविक जमतात. जळगाव जिल्ह्यातून पंढरपूर येथे जाणाऱ्यांसाठी राज्य परिवहन महामंडळाच्यावतीने विविध आगारांमधून दररोज २५ ते ३० जादा बस सोडण्यात येत असल्याचे सांगण्यात आले.
१३ ते २२ जुलै या कालावधीत पंढरपूर येथे होणारी यात्रा तसेच गुरुपौर्णिमा हा दिवस वारकरी, भाविकांसाठी महत्त्वाचा असतो. यात्रेदरम्यान भाविकांची गैरसोय होऊ नये, यासाठी महामंडळ यात्रा काळात विशेष लक्ष ठेवून आहे. जळगाव जिल्ह्यातून १२५ बसेस सोडण्यात येणार आहेत. तसेच जालना आगाराला ५० आणि नगर आगाराला ७५ बसेस पुरविण्यात आल्या आहेत.
तिकिटांची वेळोवेळी तपासणी होणार
महामंडळाच्या बसमधून पंढरपूरला जाणाऱ्या विविध मार्गावर तपासणी नाके उभारण्यात येणार आहे. तिकिटांची वेळोवेळी तपासणी केली जाईल. पंढरपूरला आषाढी यात्रेसाठी जाण्यास जळगावहून सुमारे ७३६ रुपये तसेच अन्य आगारातून सर्वसाधारणपणे ७५० रुपयाच्या जवळपास प्रवासभाडे आहे. महिला भाविक प्रवाशांना अर्धे तिकीट तसेच ७५ वर्षे वयोगटावरील ज्येष्ठ नागरिकांना असलेल्या महामंडळाच्या योजना जादा बससेवेसाठीही लागू राहणार असल्याची माहिती परिवहन महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी दिली.