बदलत्या जीवनशैलीचा परिणाम : पाच वर्षांत कावळ्यांची लक्षणीय घट
साईमत/सोयगाव/प्रतिनिधी :
पितृपक्षात पूर्वजांच्या आठवणी व त्यांच्या नैवेद्यासाठी कावळ्यांचे स्मरण होते. मात्र, मानवी स्वार्थामुळे व बदलत्या वातावरणामुळे कावळ्यांच्या संख्येत घट होत आहे. सोयगाव तालुक्यात पितृपक्षात कावळ्यांचे दर्शन दुर्मीळ झाले आहे. तालुक्यात काही परिसरात बागायती क्षेत्र असल्याने पूर्वीच्या काळात पक्ष्यांची व कावळ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात होती. मात्र, गेल्या पाच ते सात वर्षांपासून पक्ष्यांची संख्या कमी होत आहे. मानवाचे निसर्गावर अतिक्रमण, बदलती जीवनशैली आणि वातावरणात बदलामुळे कावळ्यांच्या संख्येत घट झाली आहे. त्यामुळे कावळ्यांचे दर्शनच दुर्लभ झाले आहे.
स्वच्छतादूत म्हणून ओळख
नैसर्गिक स्वच्छतादूत असणारे कावळे पर्यावरणाची साखळी चालविण्यासाठी अत्यावश्यक असून, कावळा हा सर्व पक्ष्यांमध्ये चतुर पक्षी म्हणून ओळखला जातो. शेतकऱ्यांसह प्रत्येक मानवाने पक्ष्यांना आपले मित्र समजून त्यावर प्रेम करणे काळाची गरज आहे.
कावळ्यांच्या संख्येत दिवसेंदिवस घट
कावळ्यांची संख्या अशीच घटत राहिल्यास येणाऱ्या काळात पिंडदानाला शिवायलाही कावळा शिल्लक राहणार नसल्याची भीती अभ्यासकांकडून वर्तवली जात आहे. तालुक्यात मोबाइल टॉवरमुळे चिमण्या, फुलपाखरे नाहीसे होत असल्याचे बोलले जात आहे.कावळ्याचे महत्त्व हिंदू संस्कृतीत व्यक्तीच्या मरणोत्तर पिंडाला शिवून मोक्ष प्राप्त करून देण्यासाठी कावळ्याचे मोठे योगदान मानले जाते. पितृपक्षात पूर्वजांच्या आठवणी व त्यांना आवडणाऱ्या पदार्थाच्या नैवेद्यासाठी तेवढ्यापुरतेच कावळ्यांचे स्मरण होत असते.
नैवेद्य कावळ्याऐवजी गायीला
पितृपक्षात नैवेद्य खाण्यासाठी सकाळपासून कावळ्यांची प्रतीक्षा करीत असलेले अनेक जण अखेर गायीला खाऊ घालतात किवा नदीत विर्सजित करतात.सद्यःस्थितीत पर्यावरणाच्या बदलत्या वातावरणाचा परिणाम कावळ्यांसह इतरही पक्ष्यांवर झाला आहे. अजिंठा डोंगराच्या पायथ्याशी असलेल्या तालुक्यात पक्ष्यांची संख्या घटली आहे.