शाळा प्रशासनासह ग्रामस्थांवर होतोय अभिनंदनाचा वर्षाव
साईमत/जळगाव/प्रतिनिधी:
तालुक्यातील पिलखेडे येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आदर्श मराठी शाळा, पिलखेडे या शाळेने ‘मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा’ उपक्रमांत जिल्हास्तर व विभागीय स्तरावर घवघवीत यश संपादित केले आहे. त्याबद्दल शाळा प्रशासन व ग्रामस्थांवर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
‘मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा’ या राज्यस्तरावरील आदर्श उपक्रमाचा दुसरा टप्पा नुकताच पूर्ण झाला आहे. या टप्प्यावरील मुल्यांकन जाहीर झालेले असून त्यात जळगाव तालुक्यातील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आदर्श मराठी शाळा, पिलखेडे जिल्हा परिषद शाळेने प्राथमिक गटातून जळगाव जिल्ह्यात प्रथम क्रमांक पटकावला आहे. नाशिक विभागीय स्तरावर तृतीय क्रमांक प्राप्त करत घवघवीत यश संपादित केले आहे.
पिलखेडे शाळेच्यावतीने विद्यार्थ्यांसाठी आघाडी घेतली विविध उपक्रम राबविले. दर शनिवारी दप्तरमुक्त शाळा घेतली जाते, सोबतच विविध आनंददायी उपक्रम राबवून शनिवारची शाळा आनंददायी केली जाते. शनिवारचा आनंद आठवडाभर दरवळत ठेवणारी ही शाळा आहे. शाळेने लोकसहभागातून संरक्षक भिंत, खुले वाचनालय, बोलक्या भिंती असे उपक्रम राबविले आहेत.
मी इंग्रजी शिकणारी हा या शाळेतील वैशिष्ट्येपूर्ण उपक्रम आहे.
शालेय पातळीवर क्रीडा स्पर्धा, नाविन्यपूर्ण शैक्षणिक सहल ही या शाळेची वैशिष्ट्ये आहेत. शाळेची नुकतीच मुंबई दर्शन व महाराष्ट्र दर्शन ही शैक्षणिक सहल पार पडली. त्यावेळी पिलखेडे शाळेतील विद्यार्थ्यांशी स्वतः शिक्षणमंत्री ना.दीपक केसरकर यांनी संवाद साधला होता.गुणवत्तापूर्ण शिक्षणासोबतच शाळेने सर्व निकष व उपक्रम पूर्ण करून यश मिळवले आहे. एकीकडे मराठी शाळा बंद पडत असतांना मराठी शाळेने छोट्याश्या गावात असून विभाग स्तरावर यश संपादन केले आहे. यामुळे जळगाव तालुक्यात व जिल्ह्यात शाळेचे कौतुक होत आहे.
यासाठी शाळेचे मुख्याध्यापक दशरथ वाघ, राज्य पुरस्कार प्राप्त ज्येष्ठ आदर्श शिक्षक ज्ञानेश्वर सोनवणे, मंगलदास भोई, संतोष वानखेडे, प्रदीप पेदोर, मिरा सनेर, मनिषा मारकड यांच्यासह शाळेतील शिक्षकांनी परिश्रम घेतले. तसेच जि. प. शिक्षणाधिकारी विकास पाटील , गटशिक्षणाधिकारी सरला पाटील यांचे मार्गदर्शन लाभले.