लाखा बंजारा ग्रुपतर्फे ‘जळगाव ते राजस्थानातील रामदेवराला पदयात्रा रवाना
साईमत/जळगाव/प्रतिनिधी :
मानवी जीवनात अध्यात्मिक तसेच चिंतनामुळे मनाला समृध्दी, संपन्नता, शांती लाभते. हजारो किलोमीटर असणाऱ्या पदयात्रेला यात्रेकरु जात आहेत. त्यासाठी आपल्यात असणारी जी काही वाईट व्यसने असतील त्यांचा रामदेव बाबांच्या चरणी त्याग करावा. यासोबतच एक चांगला संकल्प घेऊन चांगल्या मनाने पदयात्रा करुन परत यावे, असा उपदेश जामनेर येथील गुरूदेव सेवा आश्रमाचे प.पू. श्याम चैतन्य महाराज यांनी दिला. लाखा बंजारा ग्रुपतर्फे आयोजित ‘जळगाव ते रामदेवरा’ (राजस्थान) पदयात्रेला शनिवारी, २६ जुलै रोजी प्रारंभ करण्यात आला. त्यावेळी ते पदयात्रेकरुंसह उपस्थित समाज बांधवांसमोर मार्गदर्शन करतांना बोलत होते.
सुरुवातीला जळगावातील राधाकृष्ण मंगल कार्यालयासमोरील रामदेव महाराज यांच्या मंदिरात प.पू. श्याम चैतन्य महाराज यांच्या हस्ते महाआरती करण्यात आली. त्यानंतर त्यांनी उपस्थितांना उपदेशपर प्रवचनाद्वारे मार्गदर्शन केले. याप्रसंगी बी.बी.धाडी, विजय महाराज, भारमल नाईक, रोहीदास पवार यांच्यासह समाज बांधव उपस्थित होते.