नागरिकांची मागणी प्रशासनाने तातडीने कचरा निर्मूलन केले पाहिजे
साईमत / जळगाव / प्रतिनिधी
शहरातून शिरसोलीकडे जाणारा मुख्य मार्ग आता ‘कचरा डेपो’मध्ये परिवर्तित झाल्याचे चित्र समोर आले आहे. श्रीकृष्ण लॉनपासून ते जुन्या जकात नाक्यापर्यंत रस्त्याच्या दोन्ही बाजूंना ढिगारे टाकले गेले असून प्रवाशांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.
मेहरुण तलावाच्या निसर्गरम्य परिसरात स्थित हा रस्ता सिमेंट काँक्रिटीकरणामुळे सुरकुत्या व अडथळ्यांपासून मुक्त झाला असला, तरी सध्या कचऱ्याच्या ढिगाऱ्यांमुळे त्याचे सौंदर्य पूर्णपणे नष्ट झाले आहे. या मार्गावर अभियांत्रिकी महाविद्यालय, वैद्यकीय महाविद्यालय, जैन हिल्ससारख्या महत्त्वाच्या संस्था तसेच अनेक मंगल कार्यालये असल्याने सतत वर्दळ राहते. पाचोरा, चाळीसगाव तसेच नाशिक-पुण्याकडे जाण्यासाठीही हा मार्ग अत्यंत महत्वाचा आहे.
काही सामाजिक संघटनांनी या परिसरात वृक्षारोपण करून पर्यावरण संवर्धनाचा प्रयत्न केला असला, तरी कचऱ्यामुळे हे सर्व प्रयत्न व्यर्थ ठरत आहेत. जोरदार वाऱ्यामुळे कचरा रस्त्यावर उडून येतो व वाहनचालकांच्या डोळ्यात जात असल्याने अपघाताची शक्यता वाढली आहे.
प्रशासनाचे दुर्लक्ष
स्थानिक नागरिकांचा आरोप आहे की, कचरा टाकणाऱ्यांवर प्रशासनाची ठोस कारवाई होत नाही. ‘स्वच्छ जळगाव, सुंदर जळगाव’च्या घोषणांनंतरही ही समस्या कायम असल्याचे नागरिक म्हणतात. दंडात्मक कारवाईच्या अभावामुळे कचरा टाकण्याची प्रथा दिवसेंदिवस वाढत आहे.
आरोग्यावर धोका
साचलेल्या कचऱ्यामुळे परिसरात डासांची संख्या वाढली असून नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. विशेषतः पावसाळ्यात परिस्थिती अधिक गंभीर होण्याची शक्यता आहे.
शहराच्या सौंदर्याला बाधा आणणाऱ्या आणि नागरिकांच्या आरोग्यास धोका निर्माण करणाऱ्या या समस्येकडे प्रशासनाने तातडीने लक्ष देऊन कठोर कारवाई करणे आवश्यक असल्याची मागणी नागरिकांकडून जोर धरत आहे.
