साईमत, जळगाव : प्रतिनिधी
भारतात संविधान विरोधी शक्ति अधिक सक्रिय आहे. आपल्या देशाचा राज्यकारभार मनुस्मृतीने चालतो का संविधानाने? या संदर्भाने सर्वोच्च न्यायालयात केसही सुरु आहे. तेव्हा सर्व संविधानप्रेमी जनतेने संविधान गौरवार्थ अधिक संघटित व सक्रिय व्हावे, असे आवाहन साहित्यिक जयसिंग वाघ यांनी केले. २६ नोव्हेंबर रोजी संविधान गौरव समिती जळगावतर्फे आयोजित संविधान गौरव रॅलीनिमित्त तांबापुरा येथील बौद्ध वस्तीत प्रचार सभेत ते बोलत होते. अध्यक्षस्थानी जनक्रांती मोर्चाचे अध्यक्ष मुकुंद सपकाळे होते.
ते पुढे म्हणाले की, जळगाव शहरात संविधान गौरव दिनानिमित्त विविध कार्यक्रम घेण्यात येत आहेत. विविध सामाजिक, राजकीय संघटना त्यात सहभागी होत आहेत. त्यात आपणही मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे सांगितले.
संविधानात असलेल्या विविध तरतूदी ज्यामुळे इथल्या सर्व शोषित, अल्पसंख्यांक, स्त्री पुरूष व सर्वच जनतेला न्याय मिळत आहे. तो कसा सुरक्षित आहे त्याची मुकुंद सपकाळे यांनी माहिती दिली. सभेत समाधान सोनवणे, पंकज सोनवणे, रवि सोया, राजू सोया, प्रकाश वाघ, सूर्यभान वाघ, प्रवीण वाघ, संदीप वारुळे, मुकेश सपकाळे यांनीही मनोगत व्यक्त केले.
सुरवातीला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास जयसिंग वाघ, मुकुंद सपकाळे यांच्या हस्ते माल्यार्पण करण्यात आले. शेवटी संविधान गौरवार्थ विविध घोषणा देण्यात आल्या. प्रास्ताविक भारत सोनवणे, स्वागत सोमा ससाने तर आभार बुद्धपाल सपकाळे यांनी मानले.