जळगाव जुक्टो संघटनेच्या मागणीचे आमदारांना दिले निवेदन
साईमत/जळगाव/प्रतिनिधी :
जिल्ह्यात बहुतांश उच्च माध्यमिक व कनिष्ठ महाविद्यालयात शिक्षकांची पदे गेल्या २०१२ पासून शिक्षक भरती बंद असल्याने रिक्त आहेत. अशावेळी व्यापक विद्यार्थी हित लक्षात घेता संबंधित शिक्षण संस्थांनी प्रशिक्षित अर्हताधारक शिक्षकांची शासन नियमानुसार घड्याळी तासिका तत्त्वावर निव्वळ तात्पुरत्या स्वरुपात नियुक्ती केली आहे. शिक्षकांना शासन शैक्षणिक वर्षाच्या शेवटी मानधन अदा करीत असते. मात्र, जळगाव जिल्ह्यात शैक्षणिक वर्ष २०१८-१९ पासून कार्यरत जवळपास २० शिक्षकांचे मानधन जे की अत्यंत तुटपुंज्या प्रमाणात आहे, ते शिक्षण आयुक्त स्तरावरून अद्यापही मंजूर न झाल्यामुळे संबंधित शिक्षकांना अद्यापही अदा झालेले नाही. त्यामुळे घड्याळी तासिका तत्त्वावरील शिक्षकांचे थकीत मानधन त्वरित अदा करावे, अशी मागणी जळगाव जुक्टो संघटनेच्यावतीने पदवीधर आमदार सत्यजित तांबे, शिक्षक आमदार किरण सरनाईक, विक्रम काळे, जयंत आसगावकर यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे केली आहे.
यासंदर्भात जिल्हा संघटनेने राज्य कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक महासंघाच्यावतीने शासन दरबारी वारंवार प्रयत्न केले. तसेच शिक्षण उपसंचालक कार्यालयात संघटनेच्या माध्यमातून वेळोवेळी प्रश्न मांडूनही ही समस्या आजतागायत सुटलेली नाही. ही समस्या लवकरात लवकर न सुटल्यास संघटना आंदोलन उभारण्याच्या तयारीत आहे. शासनास ह्या शिक्षकांचा विसर पडला की काय, अशी स्थिती निर्माण झाली आहे. वाढत्या महागाईच्या काळात ज्या थोड्या बहुत रकमेचा काहीसा आधार संबंधित शिक्षकांना झाला असता, तो मिळणे दुरापास्त झाले आहे.
संबंधित शिक्षकांना त्वरित रक्कम द्यावी
सध्या सुरू असलेल्या विधिमंडळ अधिवेशनात शिक्षक व पदवीधर आमदारांनी या मागणीकडे विशेष बाब म्हणून राज्याच्या शालेय शिक्षण विभागाकडे मागणी करावी, संबंधित शिक्षकांना त्वरित रक्कम द्यावी, अशी आग्रही मागणी जळगाव जिल्हा कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक संघटनेच्यावतीने अध्यक्ष प्रा.नंदन वळींकार, सचिव प्रा.सुनील सोनार, प्रा.सुनील गरुड, प्रा.डी.डी. पाटील, डॉ.अतुल इंगळे, प्रा.राजेंद्र तायडे (उपाध्यक्ष), कार्याध्यक्ष प्रा.शैलेश राणे यांनी लेखी निवेदनाद्वारे केली आहे.