जि.प.,पं.स. निवडणुकीत उमेदवारांच्या मतदानात मोठा खड्डा पडणार?
साईमत/ यावल /प्रतिनिधी :
तालुक्यातील मारूळ ते न्हावी रस्त्याच्या आजूबाजूने मोठ्या प्रमाणात काटेरी झाडे-झुडपे झाल्यामुळे तसेच रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडल्याने ग्रामस्थांसह वाहनधारकांना मोठा त्रास सहन करावा लागत असून वाहतुकीस अडथळा निर्माण होत असल्याने होणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीतील उमेदवाराच्या मतदानावर विपरीत परिणाम होणार असल्याची चर्चा ग्रामस्थांमध्ये सुरू आहे.
मारूळ ते न्हावी रस्त्याचे दोन्ही बाजुने मोठ्या प्रमाणावर काटेरी झुडप्यांचे साम्राज्य पसरले आहे. झुडपांमुळे मोठ्या प्रमाणावर अडथळा निर्माण होत असून मोठ्या अपघाताची शक्यता नाकारता येत नाही. मारूळ ते न्हावी या ४ कि.मी.लांबीच्या रस्त्यावर झाडाझुडपांमुळे समोरून येणारे वाहन दिसत नाही.
या रस्त्याची अतिशय दुर्दशा झाली असल्यामुळे या रस्त्यावरील वाहतूक धोक्याची, जीवघेणी झाली आहे. मारूळ ते न्हावी हा रस्ता इतका खराब झाला आहे की, रस्त्यात खड्डे की खड्ड्यात रस्ता, हेच समजत नाही. तसेच या रस्त्याची दोन्ही बाजूकडील साईटपट्ट्यांची अनेक वर्षापासून दुरुस्ती व भराव न झाल्यामुळे साईटपट्ट्या पूर्णपणे निकामी, अदृश्य झाल्या आहेत. साईडपट्ट्या खोल झाल्यामुळे समोरून येणाऱ्यां वाहनांना साईट दिली तरी अपघात होण्याची शक्यता निर्माण होते.
रिक्षा चालकांनी बुजविले खड्डे
मारूळ-न्हावी या रस्त्यावर अनेक शेतकऱ्यांनी पाण्याच्या पाईपलाईन टाकण्यासाठी खोदकाम केल्याने रस्त्यावर मोठमोठे खड्डे झालेले आहेत. अपघाताची शक्यता लक्षात घेता रिक्षा चालकांनी एकत्र मिळून मातीचा भर टाकत खड्डे बुजविले. यामुळे वाहनधारकांना थोडा दिलासा मिळाला असून रिक्षा चालकांचे ग्रामस्थांसह वाहनधारकांतर्फे कौतूक होत आहे.
रस्त्याची दुरुस्ती कागदोपत्री
मोटरसायकलवर मागे महिला असेल तर स्थिती अधिक बिकट होते. मारूळ ते न्हावी रस्त्याची गेल्या अनेक वर्षापासून दुरुस्ती व साईडपट्ट्या भरावाचे काम संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी तसेच लोकप्रतिनिधींनी केली नाही. संबंधित अधिकाऱ्यांनी या रस्त्याची दुरुस्ती कागदोपत्री दाखवली असावी? असा प्रश्न ग्रामस्थांसह वाहनधारकांमध्ये उपस्थित होत आहे.याबाबत वरिष्ठ पातळीवरून चौकशी करून लवकरात लवकर रस्त्याच्या आजूबाजूची काटेरी झाडेझुडपे जेसीपी मशीनने काढून रस्त्याच्या साईडपट्ट्या व डांबरीकरणाचे काम करावे, अशी मागणी ग्रामस्थांसह वाहनधारक करीत आहे.
