साईमत, जळगाव : प्रतिनिधी
जळगाव शहरातील शिवाजी महाराज नगरातील मशिदीसमोर असलेली एक तीन मजली जुनी इमारत मंगळवारी सकाळी ८.३० वाजेच्या सुमारास अचानक कोसळली. यात चार जण या इमारती खाली अडकले होते. त्यापैकी तिघांना वाचविण्यात यश आले असून एक ७५ वर्ष वयाची महिला इमारतीच्या ढीगाऱ्याखाली अडकली होती. तिला वाचवण्यासाठी शर्तीचे प्रयत्न केले. पण ती वाचू शकली नाही. तिचा दबून मृत्यू झाला. राजश्री सुरेश पाठक असे त्या महिलेचं नाव आहे. बंद घरात पूजा करण्यासाठी आणि पाणी भरायला पाठक कुटुंबिय आले होते. त्याचवेळी ही दुर्घटना घडली.
जळगाव शहरातील शिवाजी नगरात सुमारे ७० वर्ष जुनी इमारत आहे. पाठक कुटूंबियांची ही इमारत आहे. या इमारतीमध्ये ते राहत नव्हते. मात्र, इमारतीचे मालक पाठक कुटुंबीय अधुनमधून या ठिकाणी पूजा करायला किंवा पाणी भरण्यासाठी येतात. नेहमीप्रमाणे ते या ठिकाणी मंगळवारी पाणी भरायला आणि पूजा करण्यासाठी आले होते. याच दरम्यान सकाळी ८.३० वाजता अचानक त्यांची तीन मजली इमारत कोसळली. घटनेची माहिती मिळाल्यानंतर तातडीने महापालिकेचे कर्मचारी या ठिकाणी पोहोचले व बचाव कार्य सुरू केले. त्यात तीन जणांना वाचविण्यात यश आले तर एक महिला या ठिकाणी अडकलेली होती. तिला वाचवण्याचे प्रयत्न झाले, पण पाच तासाच्या शोधमोहिमेनंतर संबंधित महिलेचा मृतदेह मिळून आला.
पालकमंत्र्यांची घटनास्थळाला भेट
मंत्री गुलाबराव पाटील यांनीही इमारत कोसळेल्या ठिकाणी भेट दिली आहे. या ठिकाणी मंत्री गुलाबराव पाटील यांनी भेट देत घटनेविषयी अधिकाऱ्यांकडून माहिती घेतली..या इमारतीचे मालक असणाऱ्या पाठक कुटुंबीयांना मंत्री गुलाबराव पाटील यांनी धीर दिला आहे.
महापालिकेकडून देण्यात आली होती नोटीस…
अनेक वर्षांपासून इमारत जीर्ण झाली होती. ती रिकामी करण्याबाबत महापालिका प्रशासनाच्या वतीने संबंधित कुटुंबीयांना नोटीस देण्यात आली होती. दुर्घटना घडली तेव्हा, या इमारतीमध्ये एकूण चार जण होते. त्यापैकी तीन जणांना वाचवण्यात यश आल आहे, अशी माहिती मंत्री गुलाबराव पाटील यांनी दिली आहे. जी महिला या ठिकाणी अडकली होती, ती या इमारतीमध्ये राहत नव्हती. आज संबंधित महिला त्या ठिकाणी पूजेसाठी तसेच पाणी भरण्यासाठी आल्याची माहिती समोर आली आहे. नेमक्या त्याच व्ोळी ही दुर्घटना घडल्याची माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी दिली आहे.