अनेक वर्षांपासून परिस्थिती ‘जैसे थे’, रा.प. महामंडळासह लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष
साईमत/ न्यूज नेटवर्क/ धानोरा, ता.चोपडा :
३६ प्रवाशांची दररोजची ये-जा आणि अनेक वर्षांपासून बस स्थानकाअभावी ‘जैसे थे’ परिस्थिती असल्याने याकडे रा.प. महामंडळासह लोकप्रतिनिधींचे जाणीवपूर्वक दुर्लक्ष होत आहे. याकडे आ.लताताई सोनवणे, केंद्रीय मंत्री रक्षाताई खडसे, चोपडा राज्य परिवहन महामंडळ आणि जळगाव यांनी लक्ष देण्याची गरज असल्याची अपेक्षा प्रवाशांमधून व्यक्त होत आहे. बस स्थानकाची नव्याने उभारणी करण्यात यावी, अशा आशयाचे अनेक ठराव आतापर्यंत ग्रामपंचायतमार्फत दिले आहे. याकडे राज्य परिवहन विभाग जळगाव यांनी दुर्लक्ष केल्याचे दिसून येत आहे.
चोपडा तालुक्यातील अति महत्त्वाचे गाव म्हणून ओळख असलेल्या धानोरा गावाच्या बाहेर असलेल्या बस स्थानक दुरावस्थेमध्ये ‘गाव तसेच चांगले मात्र गावाला बस स्थानक नाही मिळाले’ अशी चर्चा धानोरासह परिसरात आहे. गाव जवळपास 22 ते 25 हजार लोक वस्तीचे आहे. परिसरातील 36 खेड्यांचा दररोजचा दैनंदिन व्यवहार गावात होतात. त्यात देवगाव, पारगाव, मोहरद, बिडगाव, मितावली, लोणी, पंचक, खर्डी लागुन आहेत. परंतु धानोरा येथील बस स्थानकाअभावी, प्रवाश्यांचे मोठ्या प्रमाणावर हाल होत आहेत.
चोपडाहून येणारी गाडी यावल की जळगाव यासंदर्भात प्रवासी संभ्रमात असतात. नवीन असलेले प्रवासी चोपडा, जळगाव, यावल या टीपॉईंटवर थांबतात. त्यामुळे बस आल्यावर प्रवाशांची तारांबळ उडते. त्यामुळे मोठा अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. जवळच प्राथमिक व माध्यमिक शाळा असल्याने मोठ्या प्रमाणावर शालेय विद्यार्थ्यांची गर्दी होत असते. राज्य महामार्ग गतिमान असून मोठ्या अवजड वाहनांची रहदारी दिवसभर सुरू असते. त्यामुळे एखाद्या वेळेस मोठा अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. धानोरा गावाच्या बस संघाचे गृहस्थ गेल्या अनेक वर्षांपासून अशीच आहे.
प्रवाशांची धावपळ थांबण्याची अपेक्षा
जळगाव येथे जाणारे बरेच प्रवासी यावल जुने बस स्थानक समोर उभे असतात. परंतु जळगाव जाणारी गाडी केव्हा येते व केव्हा जाते त्याचा नवीन प्रवाशांना थांगपत्ता लागत नाही. बस स्थानकाची सोय नसल्याने प्रवासी उन्हाळ्यात व पावसाळ्यात झाडे व पत्रांचा आडोसा घेऊन उभे राहतात. प्रवाशांना बसायला जागा नाही. एखाद्या फाट्यावर उभे राहून बसची वाट पहावी लागते, अशीच परिस्थिती धानोरा बस स्थानकाची दिसून येते. त्यामुळे प्रवाशांची गैरसोय होत आहे. गेल्या अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेल्या व सणाचा प्रश्न सोडविणे गरजेचे असेल. याठिकाणी नवीन टी पॉईंट बस स्थानक बांधण्यात यावे. जेणेकरून तिन्ही मार्गावरून धावणाऱ्या बसेस समजतील आणि त्यांचे होणारे हाल थांबतील. प्रवासी एकाच ठिकाणी बसू शकतील. त्यामुळे प्रवाशांचे धावपळ होणार नाही, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
नवीन बस स्थानक होणे गरजेचे
धानोरा गाव परिसरातील खेडे, वस्ती आदी असुन लोकसंख्येच्या दृष्टीने गावांच्या माध्यमातून विकासाच्या दृष्टीने गावाला नवीन बस स्थानक मिळणे गरजेचे आहे.
-ज्ञानेश्वर सोनवणे
बस स्थानकातील अतिक्रमण काढावे
तालुक्यातील मोठी लोकसंख्या असल्याचे गाव असल्याने येथे मोठी दररोजची नागरिकांची वर्दळ सुरु असते. त्यामुळे बस स्थानक परिसरातील अतिक्रमण काढून नवीन बस स्थानक होणे गरजेचे आहे.
-गोकुळ कोळी