साईमत, जामनेर : प्रतिनिधी
जळगाव येथे नुकत्याच झालेल्या महाराष्ट्र बाल राज्यनाट्य स्पर्धेमध्ये जामनेर येथील स्वराज्य प्रतिष्ठान संचलित पोदार जीनियस इंटरनॅशनल स्कुल या शाळेने यावर्षी पहिल्यांदाच आपला सहभाग नोंदविला. उत्कृष्ट कथालेखन, पात्रांचा जिवंतपणा, साजेसे नेपथ्य आणि आणि प्रेक्षकांच्या टाळ्या या सर्वांमुळे छत्रपती संभाजी महाराज नाट्य सभागृहात सादर झाले. नाटकाचे लेखन आणि दिग्दर्शन संतोष मधुकर शिराळे यांनी केले. नाटकात विद्यार्थ्यांनी सुरेखपणे अभिनयाची चुणूक दाखविली.
लहानग्या आदी नावाच्या लहान मुलाभोवती गुंफलेली ही कथा अतिशय साधी, सरळ पण तितकीच आपल्याला आपल्यातली वाटणारी अशी होती. लहान मुलांना अभ्यासाचा येणारा कंटाळा त्यात टीव्हीवर बघितले जाणारे सुपर कार्टून्स आणि मग आपल्याही जीवनात, आपल्याजवळही अशीच एखादी सुपर पावर आहे किंवा असेल असा मानसिक समज, या सर्वांमुळे अभ्यासावर होणारा दुष्परिणाम असा एक सध्याचा परिस्थितीतला अतिशय महत्त्वाचा धागा घेऊन लेखक संतोष शिराळे यांनी हे नाटक लिहिले आहे. त्यात विद्यार्थ्याला आपल्या हातून झालेली चूक समजते व तो पुन्हा अभ्यासाकडे वळतो. असे दाखविल्यामुळे नाटकाचा शेवट नक्कीच चांगला झाला असल्याचे जाणवते. नाटकातील इतर सर्वच लहान-मोठे पात्रही आपापल्या भूमिकेत उठावदार झाले आहेत.
‘सुपर पावर’ नाटकामध्ये अभिनव पाटील, मानवी चौधरी, स्वराली पाटील, ज्योतिरादित्य पाटील, सुजित सोनवणे, लिशा जवरे, प्रगती पाटील, ईश्वर कोळी, उत्कर्ष पाटील, कपिल पाटील, मोरेश्वर इंगळे, मिताली चौधरी, दर्शन पाटील, दिक्षिका राठोड, अनय सूर्यवंशी, दर्शिल पाटील, अनन्या चौधरी, यज्ञा चौधरी, आर्या महाजन, सोनाक्षी पाटील, तेजल पाटील, साक्षी भुसांडे या विद्यार्थ्यांनी अतिशय सुरेखपणे आपल्या अभिनयाची चुणूक दाखविली.
मयूर शिंपी ह्याने संगीत संयोजन केले तर गिरीश अहिरराव आणि प्रणव खैरे या विद्यार्थ्यांनी दिलेले लाईव्ह म्युझिक अत्यंत प्रभावी ठरले. नेपथ्य राहुल भारंबे, अनिल सोळंके, प्रकाश योजना प्रांजल पंडित, रंगभूषा वेदांत पाटील तर वेशभूषा अभिराज खाकरे यांनी सांभाळली.
यशस्वीतेसाठी स्वराज्य प्रतिष्ठान आणि जीनियस स्कुलचे सर्व पदाधिकारी, सदस्य, शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी तसेच मनोज पाटील आणि संपूर्ण पालक वर्ग अशा सर्वांचे सहकार्य मिळाल्याचे मत लेखक तथा दिग्दर्शक संतोष शिराळे यांनी व्यक्त केले.