साईमत पारोळा प्रतिनिधी
पारोळा नगरपरिषदेत शिवसेना शिंदे गटाने संघटनात्मक बांधणीला अधिक बळ देत महत्त्वाची जबाबदारी वाटप प्रक्रिया पूर्ण केली असून नगरसेवक अमृत (नाना) चौधरी यांची गटनेतेपदी निवड करण्यात आली आहे. आगामी उपनगराध्यक्ष निवडणूक तसेच नगरपरिषदेच्या पहिल्या सर्वसाधारण सभेच्या पार्श्वभूमीवर ही निवड राजकीयदृष्ट्या अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे.
उपनगराध्यक्ष पदाच्या निवडीपूर्वी शिवसेना शिंदे गटाची विशेष बैठक पार पडली. या बैठकीत सर्व नगरसेवकांच्या एकमताने अमृत चौधरी यांची गटनेतेपदी निवड करण्यात आली. याच बैठकीत पंकज मराठे यांची उपगटनेतेपदी तर नितीन सोनार यांची प्रतोद म्हणून नियुक्ती करण्यात आली. कोणताही मतभेद न होता सर्वानुमते झालेल्या या निवडीमुळे गटातील एकजूट आणि संघटनात्मक शिस्त अधोरेखित झाली आहे.
दरम्यान, येत्या १५ जानेवारी रोजी पारोळा नगरपरिषदेची पहिली सर्वसाधारण सभा होणार आहे. या सभेत स्वीकृत नगरसेवक पदासाठीची निवड प्रक्रिया पार पडणार असून सभेच्या अध्यक्षस्थानी लोकनियुक्त नवनिर्वाचित नगराध्यक्ष चंद्रकांत पाटील असतील. सकाळी ९.३० ते ११.३० या वेळेत उमेदवारांना नामांकन अर्ज दाखल करावे लागणार असून दुपारी १२ वाजता निवडीची घोषणा केली जाणार आहे, अशी माहिती मुख्याधिकारी तुषार नेरकर यांनी दिली. याच वेळी स्वीकृत नगरसेवकांची नावेही जाहीर होणार आहेत.
निवड प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर जळगाव येथील जिल्हाधिकारी कार्यालयात एरंडोल–पारोळा मतदारसंघाचे आमदार अमोल पाटील आणि नगराध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी पक्षातील पदाधिकारी व नगरसेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या कार्यक्रमास नगराध्यक्ष चंद्रकांत पाटील, नगरसेवक प्रमोद कासार, नजीरखान बेलदार, भूषण टिपरे, नगरसेविका किरणताई पाटील, कविताताई मिस्तरी, पल्लवीताई जगदाळे, भाग्यश्रीताई अनुष्ठान, हमीदा बी. शेख, माजी उपनगराध्यक्ष दीपक अनुष्ठान, माजी नगरसेवक मनोज जगदाळे, मनीष पाटील, विनोद वाणी, जुबेर शेख, मोहम्मद पठाण, दिलीप पाटील यांच्यासह शिवसेना शिंदे गटाचे एरंडोल–पारोळा तालुक्यातील अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
अमृत चौधरी यांच्या गटनेतेपदी निवडीमुळे नगरपरिषदेत शिवसेना शिंदे गटाची भूमिका अधिक मजबूत होण्याची चिन्हे दिसत असून, येणाऱ्या काळात उपनगराध्यक्ष निवडणूक आणि नगरपरिषदेतील निर्णयप्रक्रियेत गटाची भूमिका निर्णायक ठरण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
